मुहूर्ताच्या खरेदीला कोराेनाचा फाटा, समाधानाची गुढी उभारण्याची आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:32 AM2021-04-13T04:32:13+5:302021-04-13T04:32:13+5:30
बीड : चैत्र प्रतिपदेचा मुहूर्त आणि सुवर्ण खरेदी सण, संस्कृती आणि समाजजीवनात रुजलेली आहे, मात्र यंदही कोरोनामुळे सराफा दुकानांसह ...
बीड : चैत्र प्रतिपदेचा मुहूर्त आणि सुवर्ण खरेदी सण, संस्कृती आणि समाजजीवनात रुजलेली आहे, मात्र यंदही कोरोनामुळे सराफा दुकानांसह कापड आणि अन्य व्यावसायाची दुकाने बंद असल्याने त्याचा उलाढालीवर मोठा परिणाम होणार आहे. जागाभाडे, कर्ज, व्याज तसेच कुटुंबाची गुजराण, मोठ्या व्यापाऱ्यांची देणी कशी फेडायची या मानसिक अवस्थेत व्यापारी आहेत. तर दुसरीकडे कोरोनाशी लढादेखील महत्त्वाचा असल्याने काही महिन्यानंतर तरी समाधानाची गुढी उभारली जाईल, अशी आशा व्यापाऱ्यांना आहे.
गुढीपाडव्याला शेतकरी तसेच व्यावसायिक ट्रॅक्टर खरेदी करतात यासाठी ट्रॅक्टर विक्रेत्यांकडे उपलब्धता, मॉडेल आणि किमतीची चौकशी केली जात आहे. मात्र लॉकडाऊन आणि कोरोनामुळे सणाच्या मुहूर्ताला खरेदीसाठी व्यावसायिक व शेतकरी उत्सुक नाहीत. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे उत्पादक कंपनीकडून पाहिजे तसा पुरवठा नव्हता आता पुरवठा होत आहे तर ग्राहक नाहीत. गुढीपाडव्याला खरेदी टाळली जात असली तरी अक्षय तृतीयेला मात्र खरेदीवर भर राहील - सागर कोटेचा, ट्रॅक्टर विक्रेते.
गतवर्षी गुढीपाडव्याच्या वेळी लाॅकडाऊन होते. यावर्षीही व्यापार झाला नाही. जिल्ह्यात चार हजारपेक्षा जास्त कापड दुकाने आहेत. यात सुटे कापड, रेडिमेड होलसेल आणि किरकोळ विक्रेत्यांचा समावेश आहे. या व्यवसायात जवळपास वीस हजार कामगार वर्ग अवलंबून आहे. दुकान भाडे, कर्ज कर्जावरील व्याज जीएसटी रिटर्न त्यावर बसणारे दंड यामुळे कापड व्यापारी आर्थिक अडचणीत आहेत. - राजेंद्र मुनाेत, कापड व्यापारी.
मध्यंतरी शासनाने मुद्रांक सवलत तीन टक्क्यांपर्यंत जाहीर केली होती. सवलतीच्या काळात शासनाचा महसूल वाढला मोठ्या प्रमाणात यावर झाले मात्र सवलतीची मुदत ३१ मार्चला संपली. मुदतवाढीची मागणी क्रेडाईने केली होती. मात्र आता सवलत नसल्याने गुढीपाडव्याला घर खरेदी थांबलेली आहे. सध्या कोरोनामुळे चौकशी करणारे ग्राहकही घराच्या निर्णयाबाबत थांबलेले दिसून येत आहेत. समीर काझी, संचालक,क्रेडाई, महाराष्ट्र
गतवर्षी आणि यंदाच्या गुढीपाडव्याला सराफा व्यावसायिकांपुढे अडचणी आहेत. कोरोनाच्या भयंकर परिस्थितीमुळे शासनाच्या नियमांचे पालन करावे लागेल. सण, संस्कृती, सराफा आणि ग्राहकांचे भावनिक नाते आहे. मुहूर्तावर सुवर्ण खरेदी मोठ्या प्रमाणात ग्राहक क्षमतेनुसार करतात. मात्र व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. -- सचिन डहाळे, सराफा व्यापारी