वॉरंट बजावण्यास गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की; आरोपीला लावले पळवून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 06:38 PM2022-01-14T18:38:45+5:302022-01-14T18:39:47+5:30
आरोपीच्या पत्नी आणि दोन मुलांनी केली धक्काबुक्की
वडवणी ( बीड ) : वॉरंट बजावणीकरिता गेलेल्या पोलिसांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याचा प्रकार तालुक्यातील चिंचाळा येथे १२ जानेवारी रोजी घडला. यादरम्यान आरोपीने पोबारा केलाच, पण धक्काबुक्की करणारेही पळून गेले. त्यामुळे चौघांवर वडवणी पोलीस ठाण्यात शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दत्ता मुन्ना राठोड (रा. चिंचाळा) याचे गावाजवळ हॉटेल आहे. त्याच्याविरुद्ध वाॅरंट असल्याने बजावणीसाठी वडवणी ठाण्याचे हवालदार अन्सीराम कापले हे अन्य दोन अंमलदारां समवेत १२ रोजी हॉटेलवर गेले. यावेळी दत्ता राठोडची मुले अनिल व सुनील, पत्नी सुमन यांनी शिवीगाळ करत पोलिसांना धक्काबुक्की केली. या दरम्यान दत्ता राठोडने पलायन केले. पाठोपाठ हे तिघेही पळून गेले. याप्रकरणी हवालदार अन्सीराम कापले यांनी १३ रोजी फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा दाखल झाला. अधिक तपास उपनिरीक्षक जय परदेशी करत आहेत.