आंबाजोगाईत योगेश्वरी देवीच्या दारातून मंगळसूत्र चोरणाऱ्या पुष्पाला बेड्या
By सोमनाथ खताळ | Published: February 8, 2024 08:28 PM2024-02-08T20:28:43+5:302024-02-08T20:28:58+5:30
एलसीबीची कारवाई : दोन तोळ्याचे गंठन केले जप्त
बीड : योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास करणाऱ्या महिलेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी सायंकाळी बीड शहरातील तेलगाव नाका परिसरात केली. या महिलेकडून दोन तोळ्याचे गंठनही जप्त करण्यात आले आहे.
पुष्पा शिवराज बाबर (रा.नाळवंडी नाका, बीड) असे पकडलेल्या महिला आरोपीचे नाव आहे. २६ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास बाळासाहेब भिमराव कराड (रा.आनंदनगर, अंबाजोगाई) हे पत्नीसह योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी गेले होते.
या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होती. याचाच फायदा घेत बाळासाहेब यांच्या पत्नीच्या गळ्यातील गंठन अज्ञात चोरट्याने लंपास केले. याबाबत अंबाजोगाई शहर पाेलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. हे गंठन चोरणारी महिला पुष्पा असून ती सध्या बीड शहरातील तेलगाव नाका परिसरात असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. त्यांनी लगेच सापळा लावून तिला ताब्यात घेतले. विचारपूस केल्यावर तिने गुन्हा केल्याची कबूली दिली.
शिवाय तिच्याकडून ४८ हजार रूपये किंमतीचे दोन तोळ्याचे गंठनही हस्तगत केले आहे. या महिला आरोपीला आता अंबाजोगाई शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष साबळे व त्यांच्या पथकाने केली.