बांधकाम खात्याला काम वर्ग करूनही रस्त्यांचा दर्जा निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:34 AM2021-04-22T04:34:25+5:302021-04-22T04:34:25+5:30
माजलगाव : येथील नगरपरिषदेकडून रस्त्यांची चांगली कामे होणार नाहीत म्हणून वैशिष्ट्यपूर्ण योजनेचे २२ कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागास ...
माजलगाव : येथील नगरपरिषदेकडून रस्त्यांची चांगली कामे होणार नाहीत म्हणून वैशिष्ट्यपूर्ण योजनेचे २२ कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागास वर्ग करून शहरात दर्जेदार रस्त्यांची कामे होतील अशी जनतेची अपेक्षा असताना अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत. राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी एचडीएफसी बँकेसमोर चक्क तीन फूट उंचीचा रस्ता केला असून, तो रस्त्याऐवजी रॅम्प झाल्याने वाहने उलटून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.
माजलगाव शहरात नगरपरिषदेच्या वतीने विविध विकासकामांत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याने विकासकामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करावीत, अशी सूचना आ. प्रकाश सोळंके यांनी दिल्याप्रमाणे नगरपरिषदेने ठराव घेऊन वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील २२ कोटी रुपयांचा निधी बांधकाम विभागास वर्ग केला. आता त्यातून पाच कोटी रुपयांची रस्त्यांची ४८ कामे शहरात सुरू करण्यात आली. मात्र, दर्जेदार होण्याऐवजी ती वरून दिखावा व खाली माती अशा निकृष्ट पद्धतीने होत आहेत. बांधकाम विभागाचे अधिकारी, अभियंते तेथे गैरहजर असल्याने ठेकेदाराची माणसे दर्जा किंवा लेव्हल न बघता आहे ते काम उरकून घेत आहेत. एक तर काँक्रीट मिक्सर माल २० किलोमीटर अंतरावरून आणण्यास परवानगी असताना चक्क ६० किलोमीटर अंतरावरून अणले जात आहे. त्यामुळे ३० मिनिटांत काँक्रीट टाकायचे असताना ते दीड ते दोन तासांनी टाकले जात असल्याने घट्ट होऊन त्याची क्षमता कमी होत आहे. परिणामी कामाच्या दर्जावर प्रश्न निर्माण होत आहे. राष्ट्रीय महामार्गावर एचडीएफसी बँकेच्या समोर ५६ लाख रुपये खर्चाच्या रस्त्याला व महामार्ग जोडण्यासाठी थोड्या अंतरावरून रस्त्याची लेव्हल येण्यासाठी उंची कमी करीत जोड दिला जातो; मात्र येथे तसे न करता सरळ मोठा तीन फूट उंचीवर रॅम्प करून जोड दिला आहे. परिणामी वाहने पाठीमागून उलटण्याची भीती आहे. असाच प्रकार महात्मा फुले शाळेजवळ व अनेक ठिकाणी केला आहे. यापूर्वी हनुमान चौकात भंडारी यांचे दुकान ते नगरपरिषद असाच रॅम्प असलेला रस्ता नगरपरिषदेने बनविलेला आहे, येथे दररोज अपघात होत असताना व दर्जाची अपेक्षा असताना बांधकाम विभागाचे अधिकारी गप्प का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे, याची तत्काळ दखल घेऊन रॅम्प काढून महामार्ग लेव्हल करण्याची मागणी होत आहे.
सारेच गप्प
ज्या ठिकाणी रस्ता बनवताना मोठे वाहन जात नसेल तर या ठिकाणी पाईपद्वारे मटेरियल टाकायला हवे. परंतु, संबंधित गुत्तेदार मात्र पाईपऐवजी थेट ट्रॅक्टरद्वारे मटेरियल टाकत असल्याचे दिसून येत आहे. हा सर्व प्रकार सुरू असताना मात्र एकही नगरसेवक, नगराध्यक्ष, सामाजिक संघटना, विरोधक बोलायला तयार नाहीत.
नगरपरिषद हस्तांतर करून घेणार नाही
शहरात रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत अनेक तक्रारी येत असून, याबाबत आपण संबंधित ठेकेदाराला कामे दर्जेदार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, असेच निकृष्ट काम सुरू राहिल्यास नगरपरिषद रस्ते हस्तांतरण करून घेणार नाही.
--- शेख मंजूर -नगराध्यक्ष, माजलगाव.
फोटो ओळी : माजलगावात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामासाठी दूरवरून काँक्रीट आणले जात असून, कामाच्या स्थळापर्यंत ते घट्ट होत असून, तीन फूट उंचीचा रस्ता केल्याने अपघातांची शक्यता नाकारता येत नाही.
===Photopath===
210421\purusttam karva_img-20210415-wa0024_14.jpg~210421\purusttam karva_img-20210415-wa0027_14.jpg