माजलगावातील आठवडी बाजाराच्या जागेचा प्रश्न सुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:32 AM2021-04-06T04:32:14+5:302021-04-06T04:32:14+5:30
पुरुषोत्तम करवा माजलगाव : शहरातील आठवडी बाजाराच्या जागेचा प्रश्न मागील २० वर्षांपासून धूळ खात पडला असून, राजकारण्यांनी जागा उपलब्ध ...
पुरुषोत्तम करवा
माजलगाव : शहरातील आठवडी बाजाराच्या जागेचा प्रश्न मागील २० वर्षांपासून धूळ खात पडला असून, राजकारण्यांनी जागा उपलब्ध न करता केवळ यात राजकारण आणून हा प्रश्न चिघळत ठेवला. यामुळे येथील बाजार तुटण्याच्या मार्गावर असून, केसापुरी कॅम्प येथे मोठ्या प्रमाणावर भरवण्यात येत असतांना नगरपालिका पदाधिकाऱ्यांना अद्याप जाग आलेली नाही.
माजलगाव शहर व तालुक्यातील ४० ते ५० गावांतील ग्रामस्थांसाठी २० वर्षापूर्वी बुधवार व रविवार रोजी हनुमान चौकात बाजार भरत असे. त्यानंतर बाजारासाठी जागा कमी पडत असल्यामुळे हा आठवडी बाजार गजानन मंदिर व बी. अँड सी. रोडवर भरवला जाऊ लागला. येथे भरणारा बाजारदेखील काही राजकीय मंडळींनी उठवून लावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु शेतकऱ्यांचा होत असलेला विरोध पाहता त्या राजकीय मंडळींनी हात टेकले. परंतु गजानन मंदिर रोडवरील भागातील नागरिकांना त्रास होत असल्यामुळे ते न्यायालयात गेले. या भागातील आठवडी बाजार न्यायालयाच्या आदेशाने हटवण्यात आला.
त्यानंतर हा बाजार बायपास व बी. अँड सी. रोडवर भरवला जाऊ लागला. या बाजारात बसणाऱ्या शेतकरी व व्यापाऱ्यांकडून नगरपालिका कर वसूल करत असताना शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी पाण्याचीसुध्दा सोय नगरपालिकेकडून केली जात नाही.
या ठिकाणी भरत असलेल्या बाजाराला ही जागा पुरत नसून या ठिकाणी कसल्याच प्रकारची सुविधा उपलब्ध नाही. ५ ते ६ वर्षांपूर्वी ३८० सर्व्हे नंबरमध्ये बाजार भरवण्याचा प्रयत्न केला असता याला मोठा राजकीय विरोध झाला. त्यानंतर या जागेसंदर्भात न्यायालयाने स्टे दिला.
कोणत्याही निवडणुका आल्या की, राजकीय मंडळी बाजाराच्या जागेचा प्रश्न महत्त्वाचा करत निवडून येतात. निवडून आल्यावर ते हा मुद्दा विसरून जातात. चार महिन्यांपूर्वी शेख मंजूर यांनी नगराध्यक्षाचा पदभार घेतला तेव्हा त्यांनी व आ. प्रकाश सोळंके यांनी आठवडी बाजार न्यायालयाच्या मागे लवकरच भरवणार, असे सांगितले होते. परतु त्यांना याचा विसर पडला की काय, असा प्रश्न नागरिक, व्यापारी व शेतकरी उपस्थित करत आहेत.
आठवडी बाजाराच्या जागेबाबात आम्ही शब्द दिला होता. त्यानुसार आम्ही विविध जागांची पाहणी केली. लवकरच एका ठिकाणच्या जागेला मान्यता देण्यात येणार आहे.
- शेख मंजूर, नगराध्यक्ष