माजलगावात बांधकाम विभागाच्या दर्जेदार कामावरच प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:29 AM2021-02-15T04:29:18+5:302021-02-15T04:29:18+5:30
माजलगाव : शहरातील रस्त्यांचे काम दर्जेदार होण्यासाठी नगरपरिषदेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी वर्ग केला. परंतु त्या सुरू असलेल्या ...
माजलगाव : शहरातील रस्त्यांचे काम दर्जेदार होण्यासाठी नगरपरिषदेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी वर्ग केला. परंतु त्या सुरू असलेल्या दर्जेदार रस्ते कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सुरू असलेली रस्ता कामे थातूरमातूर होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून येत आहेत.
पाच कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील रस्ता कामांचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते झाले. यावेळी सोळंके यांनी जाहीर भाषणात दर्जेदार कामे करून घेणार असल्याचे अभिवचन दिले. परंतु त्यांचे वाक्य हवेत विरून जाण्यापूर्वीच सुरू असलेल्या रस्ते कामाच्या दर्जावर प्रश्न निर्माण होत आहे. नगराध्यक्ष शेख मंजूर यांच्या प्रभाग ११मध्ये रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट पद्धतीने होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. नगर परिषदेने बहुमताने घेतलेल्या ठरावात ही कामे पारदर्शक व दर्जेदार करून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आली. प्रत्यक्षात उपविभागीय अधिकारी हन्नम सागर यांच्या उपस्थितीत थातूरमातूर कामे उरकण्याचा सपाटा सुरू असल्याचे दिसून येत आहे.
काम सुरू करण्यापूर्वी सोलिंग करणे, मुरूम टाकून दबाई करणे, एस. डी. पी. सीटऐवजी लोकल मेनकापड वापरून डायरेक्ट माल वापरण्यात येत आहे.
त्यामुळे ही कामे वर्ष-सहा महिन्यांत वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या कामाचा बोगस दर्जा प्रभागातील रहिवाशांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे ते संबंधित गुत्तेदार व देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून कामाचे अंदाजपत्रक मागत आहेत; परंतु अधिकारी अंदाजपत्रक दाखवत नसल्याने या कामात गैरव्यवहार होत असल्याच्या शंकेला वाव मिळत आहे.
अंदाजपत्रकाचा फलक न लावताच कामे सुरू
सुरू असलेल्या रस्ते कामासंदर्भात जी अंदाजपत्रक फलक आहेत, ती कामाच्या जागेवर लावण्याचा शासनाचा नियम आहे. आमदार सोळंके यांनीही फलक लावण्याचे संबंधित एजन्सीला बजावले होते; परंतु तरीही कामांवर अंदाजपत्रकाचा फलक न लावताच कामे सुरू करण्यात आली आहेत.
बोगस कामांबद्दल तक्रार करणार
प्रभाग ११मध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी अंदाजपत्रकाची मागणी केली तरी अंदाजपत्रके देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे होणारी कामे ही अंदाजपत्रकानुसार होत नसून, थातूर मातूर पद्धतीने उरकण्यात येत आहेत. त्यामुळे होणाऱ्या या बोगस कामाची मी तक्रार दाखल करणार आहे.
- सुग्राबी शेख पाशा, नगरसेविका प्रभाग क्रमांक ११
संबंधित नगरसेवकाने तक्रार दिल्यास त्यात तथ्य आढळल्यास या कामाचे बिल दिले जाणार नाही. त्याचबरोबर अंदाजपत्रकाचे फलक दोन दिवसांत लावण्यात येतील.
- शेख मंजूर, नगराध्यक्ष