बीडमधील अवैध गर्भपात प्रकरणावरून अधिवेशनात गदारोळ; विशेष पथकामार्फत होणार चौकशी

By सोमनाथ खताळ | Published: August 18, 2022 12:34 PM2022-08-18T12:34:07+5:302022-08-18T12:35:46+5:30

जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालविण्याची घेाषणा आरोग्य मंत्री प्रा.तानाजी सावंत यांनी केली.

question rises in Vidhansabha over illegal abortion case in Beed; The investigation will be conducted by a special team | बीडमधील अवैध गर्भपात प्रकरणावरून अधिवेशनात गदारोळ; विशेष पथकामार्फत होणार चौकशी

बीडमधील अवैध गर्भपात प्रकरणावरून अधिवेशनात गदारोळ; विशेष पथकामार्फत होणार चौकशी

Next

- सोमनाथ खताळ
बीड :
तालुक्यातील बकरवाडी येथील अवैध गर्भपात प्रकरणावरून पावसाळी अधिवेशनात गुरूवारी सकाळी चांगलाच गदारोळ झाला. सर्व  सदस्य आक्रमक झाले होते. याचवेळी आरोग्य मंत्री प्रा.तानाजी सावंत यांनी या प्रकरणाचा पुन्हा एकदा विशेष पथकामार्फत तपास केला जाईल, तसेच जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालविले जाईल, अशी घोषणा केली.

शीतल गाडे (वय ३०, रा. बक्करवाडी, ता. बीड) या महिलेचा अवैध गर्भपातादरम्यान ५ जूनला मृत्यू झाला. या प्रकरणात पिंपळनेरचे उपनिरीक्षक एम. एन. ढाकणे यांच्या फिर्यादीवरून पती गणेश सुंदरराव गाडे, सासरा सुंदरराव बाबूराव गाडे (दोघे, रा. बक्करवाडी, ता. बीड), भाऊ नारायण अशोक निंबाळकर (रा. शृंगारवाडी, ता. माजलगाव), अंगणवाडी सेविका मनीषा शिवाजी सानप (रा. अर्धमसला, ता. गेवराई), प्रयोगशाळा तंत्रज्ञ वासुदेव नवनाथ गायके (रा. आदर्शनगर, बीड), सीमा सुरेश डोंगरे यांच्याविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. त्यातील सीमा हिने आत्महत्या केलेली आहे. तसेच याच गुन्ह्यात सतीश बाळू सोनवणे (रा. जाधववाडी, ता. जि. औरंगाबाद), डॉ. सतीश गवारे (रा. जालना) यांनाही तपासादरम्यान सहभाग आढळल्याने अटक केली होती.

दरम्यान, याच प्रकरणात गेवराईच आ.लक्ष्मण पवार यांनी लक्षवेधी केली. हे रॅकेट मोठे असल्याचा संशय व्यक्त करत विशेष सरकारी वकिलाची नियूक्ती करण्यासह जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालिवणार का? असा प्रश्न उपस्थित केला. यावर सावंत यांनी अगोदरच सरकारी वकील असल्याचे सांगत जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालविण्याची घेाषणा केली. तसेच आ.भारती यांच्या प्रश्नावर आरोग्य मंत्र्यांनी जिल्ह्यात पुन्हा असे प्रकार घडू नयेत, यासाठी मॉनीटरींग कमीटी नियूक्त केली जाईल असे सांगितले. या प्रकरणातील व्हिसेरा येणे बाकी आहे. तो देखील पुढील १५ दिवसांत मागवून घेऊ, असेही सावंत म्हणाले. 

आ.साेळंकेंनेही उपस्थित केला प्रश्न
या प्रकरणात एमबीबीएस असलेला डॉक्टर सहभागी आहे का, असा प्रश्न माजलगावेच आ.प्रकाश सोळंके यांनी उपस्थित केला. याला उत्तर देताना सावंत यांनी नाही, असे उत्तर दिले. परंतू पोलीस तपासात औरंगाबाद येथील सतीश सोनवणे हा एमबीबीएसचा शिक्षण घेत होता, हे समोर आलेले आहे. तर आ.शेलार यांच्या प्रश्नावर मंत्री सावंत यांनी विशेष पथकामार्फत चौकशी करू अशी घोषणा केली.

सदस्यांनी घातला गोंधळ
अवैध गर्भपाताच्या मुद्यावर काही प्रश्नांची उत्तरे समाधानकार मिळाली नाहीत, त्यामुळे सदस्यांनी गोंधळ घातला होता. आगोदर उत्तर द्या, मगच पुढे बोला, असा सुर सदस्यांमधून होता. आरोग्य मंत्री सावंत यांनी मात्र, आपण आगोदरच उत्तरे दिल्याचे सांगितले. 

आ.नमीता मुंदडा यांचीही तक्रार
या प्रकरणात केजच्या आ.नमिता मुंदडा यांनी देखील आवाज उठवला आहे. या प्रकरणात जालना व औरंगाबादमधील शिकाऊ डॉक्टरने गेवराईत येऊन अनेकदा गर्भलिंग निदान केल्याची कबुली पोलिसांना दिली. परंतू ज्यांचे निदान झाले त्या महिला कोण आहेत? त्यांचे पुढे काय झाले, मनिषा सानपसारख्या आणखी किती एजंट आहेत, याचा तपास पोलिसांनी लावलेला नाही. यासारख्या अनेक मुद्यांवरून आ. मुंदडा यांनी गृह विभागाला तक्रार केल्याचे समजते.

Web Title: question rises in Vidhansabha over illegal abortion case in Beed; The investigation will be conducted by a special team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.