बीडमध्ये नगर रोडवरील वाहतुकीचा प्रश्न ‘जैसे थे’ ....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 06:49 PM2018-07-26T18:49:59+5:302018-07-26T18:51:59+5:30
नो पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकी उचलून रस्ता खुला करू, असा दावा बीड पोलिसांनी आठवडाभरापूर्वी केला होता. ही वाहने उचलण्यासाठी टोर्इंग व्हेईकलही आणण्यात आले. परंतु अद्यापही वाहतुकीची समस्या सुटलेली नाही.
बीड : नो पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकी उचलून रस्ता खुला करू, असा दावा बीड पोलिसांनी आठवडाभरापूर्वी केला होता. ही वाहने उचलण्यासाठी टोर्इंग व्हेईकलही आणण्यात आले. परंतु अद्यापही वाहतुकीची समस्या सुटलेली नाही. वाहतूक पोलीस मात्र ‘मूग गिळून’ गप्प आहेत. केवळ ‘वसुली’ करण्यात त्यांच्याकडून प्राधान्य केले जात असल्याचे दिसून येते.
बीड शहरातील वाहतूक व्यवस्था मागील काही दिवसांपासून पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. वाहतूक पोलिसांकडून याबाबत कसलीची कारवाई केली जात नाही. चौकातचौकात उभे असणारे कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्याचे सोडून वाहने अडविण्यातच व्यस्त असतात. विशेष म्हणजे आठवडाभरापूर्वी मोठा गाजावाजा करुन नगर रोड, सुभाष रोड व इतर ठिकाणी नो पार्किंगमध्ये असणाऱ्या दुचाकी उचलण्यासाठी टोर्इंग व्हेईकल आणण्यात आले.
यासाठी वाहतूक पोलीस कर्मचारीही नेमण्यात आले. मात्र, हे कर्मचारी कारवाईत दुजाभाव करीत आहेत. तसेच दहा गाड्या पकडणे व केवळ दोनच गाड्यांकडून रितसर पावती फाडणे, इतर आठ गाड्यांना मात्र कच्च्या कागदावर त्यांचा नंबर लिहून दुचाकीस्वारांना भीती घालत त्यांच्याकडून अनाधिकृत वसुली केली जात असल्याचे समोर आले आहे.या सर्व प्रकारामुळेच वाहतूक व्यवस्था विस्कळीत असून, बीड पोलिसांची प्रतिमा मलीन होत चालली आहे.
वाहतूक पोलिसांचा धाक संपला
वाहतूक पोलीस कर्मचारी चौकात उभे असले तरीही त्यांच्यासमोरच वाहतूक कोंडी होते. शिवाय वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहनधारक सुसाट निघून जातात. हे कर्मचारी केवळ बघ्याची भूमिका घेतात. याबाबत एकवेळेस खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीही वाहतूक कर्मचाऱ्यांना धारेवर धरले होते. याउपरही सुधारणा झालेली नाही. त्यामुळेच त्यांचा सर्वसामान्यांमध्ये धाक नसल्याचे दिसून येत आहे.
व्हेईकल बनले वसुलीचे केंद्रबिंदू
नव्याने सुरू करण्यात आलेले टोर्इंग व्हेईकल वाहतूक पोलिसांसाठी अनाधिकृत पैसे वसूल करण्यासाठी एक साधन झाले आहे. बुधवारी नगर रोडवर कच्च्या कागदावर वाहन क्रमांक लिहून घेत वाहनधारकांना भीती घातली जात होती. त्यांच्याकडून २०० रुपये वसूलही केले जात होते. परंतु पावती मात्र त्यांना दिली नाही. विशेष म्हणजे वाहनधारकांना या वाहतूक पोलिसांकडून उद्धट वर्तणूक दिली जात होती.
प्रयत्न सुरू आहेत
वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. टोर्इंग व्हेईकलसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांकडून पावतीशिवाय पैसे घेतले जात असतील तर कारवाई करू. नागरिकांनीही सहकार्य करावे.
- किशोर काळे, पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक शाखा, बीड