बीड ग्रामीण पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न? शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर हल्ला करणारे सर्वच आरोपी मोकाटच
By सोमनाथ खताळ | Published: April 10, 2024 05:33 PM2024-04-10T17:33:48+5:302024-04-10T17:34:24+5:30
हल्ला प्रकरणातील सर्वच आरोपी मोकाट असून बीड ग्रामीण पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बीड : शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह ११ जणांविरोधात ५ एप्रिलला रात्री बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर शनिवारी सकाळीच दुसऱ्या गटाच्या एकाने छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयातून जबाब थेट बीड ग्रामीण पोलिसांना पाठविला. यातही ज्ञानेश्वर खांडेसह कट रचल्याप्रकरणी काही राजकीय लोकांची नावे होती. परंतू यातही अद्याप काहीच दाखल नाही किंवा चौकशीही पूर्ण नाही. हल्ला प्रकरणातील सर्वच आरोपी मोकाट असून बीड ग्रामीण पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ज्ञानेश्वर खांडे (रा. म्हाळसजवळा, ता. बीड) यांच्यावर ३ एप्रिल रोजी पिंपळनेर रोडवर हल्ला झाला होता. याप्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक हरिभाऊ खांडे, गणेश हरिभाऊ खांडे, नामदेव हरिभाऊ खांडे, गोरख ऊर्फ पप्पू शिंदे यांच्यावर कट रचला म्हणून, तर सुनील पाटोळे, बाबा रतन पाटोळे, कृष्णा पाटोळे, लाला धुनगव व इतर तीन जणांवर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणाला पाच दिवस उलटूनही अद्याप एकाही आरोपीला बीड ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली नाही. आजही काही आरोपी बीड शहरात बिनधास्त फिरत असल्याचे दिसत आहे. तसेच दुसऱ्या गटातील श्रीमंत प्रल्हाद डोळस (वय ३८, रा. म्हाळसजवळा, ता. बीड) यांनीही छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयातून बीड ग्रामीण पोलिसांना जबाब पाठविला होता. यात त्यांनी ज्ञानेश्वर खांडे यांच्यासह इतर १३ जणांची नावे घेतली होती. यावर चौकशी करून गुन्हा दाखल करू, असे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी सांगितले, होते परंतू यातही काहीच कारवाई झालेली दिसत नाही. एकीकडे चौकशी होत नाही तर दुसऱ्या बाजूला पोलिसांच्या नाकावर टिच्चून काही आरोपी बीड शहरात उघडपणे फिरत आहेत. याकडे बीड ग्रामीण पोलिसांचे दुर्लक्ष हाेत असल्याने त्यांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित होत आहे.
चौकशी सुरू आहे
जबाब दिलेल्या प्रकरणात चौकशी सुरू आहे. त्यानंतरच गुन्हा दाखल केला जाईल. तर हल्ला प्रकरणात मुख्य आरोपींना आगोदर अटक केली जाईल. त्यांची चौकशी केल्यानंतरच इतर आरोपींबाबत अटकेचा निर्णय घेतला जाईल. आमची कारवाई सुरू आहे.
- शिवाजी बंटेवाड, पोलिस निरीक्षक, बीड ग्रामीण पोलिस ठाणे