कोटेशन भरले, आता वीज जोडणीसाठी पैसे मागतात; हतबल शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 08:31 PM2023-01-17T20:31:37+5:302023-01-17T20:31:49+5:30
दोन वर्षापूर्वी तालुक्यातील टाकळी येथील धनराज घुले आणि इतर दोन शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी कोटेशन भरलेले आहे.
- मधुकर सिरसट
केज (बीड) : दोन वर्षांपासून वाट पाहूनही शेतपंपासाठी विद्युत जोडणी देण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्याने पैसे मागितल्याने हतबल शेतकऱ्याने महावितरणच्या कार्यालया समोरच आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षक फुलचंद डापकर यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. धनराज घुले असे शेतकऱ्याचे नाव आहे.
दोन वर्षापूर्वी तालुक्यातील टाकळी येथील धनराज घुले आणि इतर दोन शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी कोटेशन भरलेले आहे. परंतु अद्याप त्याला वीज जोडणी दिलेली नाही. वीज नसल्याने पिकांचे नुकसान होत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता घुले यांना गुत्तेदाराकडे पाठविण्यात आले. यावेळी गुत्तेदाराने 35 हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे शेतकरी घुले यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्मदहनाचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे श्रीकांत चौधरी, उमेश आघाव, शेख मतीन, दिलीप गित्ते, आवेज शेख, नितीन जाधव यांनी घटनास्थळी जाऊन धनराज घुले याला ताब्यात घेतले.
पैशाची मागणी केली नाही
सदर शेतकऱ्यास एसीएफ मधून वीज जोडणी देण्यात येणार आहे. परंतु त्याच्या अगोदर दोन शेतकरी आहेत. त्यामुळे जोडणीला उशीर झाला. तसेच गुत्तेदाराने पैसे लागत असल्याचे सागितले असावे, अशी माहिती सहाय्यक उपअभियंता मुंडे यांनी दिली.
राजकारणामुळे काम आडवले
गावातल्या स्थानिक राजकारणामुळे वीज जोडणीचे काम अडविले गेल्याचा आरोप शेतकरी धनराज घुले यांनी केला.