आर. आर. पाटील ग्रामस्वच्छता स्पर्धेत आवरगाव जिल्ह्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:31 AM2021-02-14T04:31:10+5:302021-02-14T04:31:10+5:30
धारूर : आर. आर. पाटील ग्रामस्वच्छता स्पर्धेत बीड जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त केले असून, ग्रामस्थांनी फटाके वाजवून ...
धारूर : आर. आर. पाटील ग्रामस्वच्छता स्पर्धेत बीड जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त केले असून, ग्रामस्थांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. राज्यात गाव आदर्श करण्याचा संकल्प सरपंच अमोल जगताप यांनी व्यक्त केला आहे.
राज्य शासनाच्या वतीने राज्यात जिल्हास्तरावर ग्रामपंचायतीसाठी राबविल्या जाणाऱ्या आर. आर. पाटील ग्रामस्वच्छता स्पर्धेत आवरगाव ग्रामपंचायतीने उत्कृष्ट काम करून तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून २० लक्ष रुपयांचा पुरस्कार मिळविला होता. जिल्हास्तरीय तपासणीतदेखील आवरगाव ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळविला. ग्रामस्थांनी एकत्रित येत सरपंच अमोल जगताप यांच्या नेतृत्वाखाली गावाचा चेहरामोहरा बदलला असून, ग्रामस्थांना सर्व सुविधा दिल्या आहेत. आर. आर. पाटील ग्रामस्वच्छता स्पर्धेत बीड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याने गावाला ५० लाखांचे बक्षीस मिळणार आहे.
पंचायत समितीचे सभापती हनुमंत नागरगोजे, उपसभापती प्रकाश कोकाटे, गटविकास अधिकारी आर. एस. कांबळे, विस्तार अधिकारी अनिल चौरे यांनी या यशाबद्दल ग्रामपंचायतीचे कौतुक केले आहे.
राज्यात आदर्श गाव करण्याचा संकल्प
आर. आर. पाटील ग्रामस्वच्छता स्पर्धेत आवरगाव ग्रामपंचायतीने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आहे. ग्रामस्थांच्या मदतीने व सहकार्यामुळे हे यश मिळाले असून, विकासकामांतून गावाचा चेहरामोहरा बदलून राज्यात आदर्श गाव करण्याचा संकल्प असल्याचा मनोदय सरपंच अमोल जगताप यांनी व्यक्त केला.