माजलगावात राडा; जाळपोळीनंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडताच पोलिसांवर दगडफेक
By सोमनाथ खताळ | Published: October 30, 2023 03:01 PM2023-10-30T15:01:30+5:302023-10-30T15:04:12+5:30
सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकातील दोन ते तीन कर्मचारी जखमी झाले आहेत.
बीड : माजलगाव शहरात सोमवारी दुपारच्या सुमारास मराठा समाज बांधवांकडून मुख्य रस्त्यावरून मोर्चा काढला जात होता. याचवेळी काही आंदोलकांनी दगडफेक केली. जमाव पाहता पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधूर सोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त जमावाने थेट पोलिसांच्या दिशेने दगड भिरकावले. यात सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकातील दोन ते तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. तर कुमावत यांच्यासह इतर पोलिसांनी माजलगाव बसस्थानकात धाव घेतली.
हा सर्व प्रकार मुख्य बसस्थानकासमोर घडल्याचे सांगण्यात आले. जखमी पोलिसांना रूग्णालयात दाखत करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी माजलगावात धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.
आमदार सोळंकेंविरोधात माजलगावात संताप
माजलगावातील राष्ट्रवादीचे आ.प्रकाश सोळंके यांच्याविरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. सोमवारी सकाळी आंदोलकांनी आ.सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली. नंतर घराजवळील त्यांच्या गाडीसह इतर वाहने पेटविले. याच ठिकाणी काही आंदोलकांनी घरातील साहित्यालाही आग लावली. हा तणाव कसा तरी शांत करून पोलिसांनी तेथून काढून दिला. परंतू आंदोलकांनी पुन्हा शहरातील मुख्य मार्गावर येत दगडफेक केली. यावेळी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व पोलिसांचा फौजफाटा शहरात पोहचला.