आरटीओत पुन्हा राडा, लिपिकाला दलालाची धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:32 AM2020-12-31T04:32:38+5:302020-12-31T04:32:38+5:30
बीड : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पुन्हा एकदा बुधवारी राडा झाला. येथील एका लिपिकाला दलालाने धक्काबुक्की करून अरेरावी करीत ...
बीड : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पुन्हा एकदा बुधवारी राडा झाला. येथील एका लिपिकाला दलालाने धक्काबुक्की करून अरेरावी करीत शिवीगाळ केली. याप्रकरणी दोन भावांवर ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला. दोन आठवड्यांपूर्वी एका महिला लिपिकाशी अरेरावी केल्याचा प्रकार घडला होता, त्यानंतरही पुन्हा एकदा एजंटाची अरेरावी समोर आली आहे. वारंवार घटना घडूनही कार्यालय काहीच उपाययोजना करीत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
सरफराज सिकंदर काझी व शहाबाज सिकंदर काझी अशी धक्काबुक्की करणाऱ्या दलालांची नावे आहेत. आरटीओ कार्यालयातील कनिष्ठ लिपिक अमर सोळंके यांनी याबाबत फिर्याद दिली. तक्रारीत म्हटले आहे की, ते बुधवारी नित्याप्रमाणे कार्यालयात काम करत होते. दुपारी एक वाजता त्यांच्याकडे सरफराज काझी हा आला. पंधरा दिवसांपूर्वी दिलेल्या कागदपत्रांचे काय झाले, अशी विचारणा त्याने केली. त्यावर सोळंके यांनी वरिष्ठ अधिकारी नसल्याने स्वाक्षरी झाली नसल्याचे सांगितले. त्यावर त्याने त्यांच्याशी वाद घातला. काही वेळाने त्याचा भाऊ शहाबाज काझी हा तेथे आला. त्याने ‘तू माझ्या भावाला शिव्या का दिल्या’, अशी कुरापत काढून कॉलर पकडून धक्काबुक्की केली. यावेळी सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यास रोखले. त्याने ‘बाहेर आल्यावर बघून घेईन,’ अशी धमकी दिली व निघून गेला. सोळंके यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण ठाण्यात शासकीय कामकाजात अडथळा आणल्यावरून गुन्हा नोंद झाला. सध्या हे दोघे भाऊ फरार आहेत.
दलालांची लुडबूड सुरूच
महिला लिपिकाशी वाद घातल्यानंतर तरी आरटीओ कार्यालय आणि येथील अधिकारी काही तरी उपाययोजना करतील, असे वाटत होते; परंतु एजंटांसोबत अर्थपूर्ण नाते असल्याने अधिकारीही मूग गिळून गप्प आहेत. याचा त्रास सामान्य कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. एवढे गंभीर प्रकार घडल्यानंतर तरी आता प्रशासन उपाययोजना करून या दलालांना प्रवेशबंदी करणार का, हे वेळच ठरवणार आहे.