तालखेड येथे क्लबवर धाड, जुगाऱ्यांमध्ये डॉक्टर, शिक्षकाचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:29 AM2021-02-15T04:29:38+5:302021-02-15T04:29:38+5:30
माजलगाव ग्रामीण पोलीस हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे बोकाळले आहेत. तालखेड परिसरात अनेक ठिकाणी क्लब चालतात. शनिवारी ...
माजलगाव ग्रामीण पोलीस हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे बोकाळले आहेत. तालखेड परिसरात अनेक ठिकाणी क्लब चालतात. शनिवारी खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून ग्रामीण ठाण्यातील पोलिसांनी कैलास मोरे यांच्या शेतात धाड टाकली. या ठिकाणी तिर्रट नावाचा जुगार खेळताना प्रकाश दौलत साबळे ,भागवत अंबादास गावडे ,गुलाब मरीबा शिनगारे, सुरेश सावंत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर हिवरा बु.येथील रहिवासी रामेश्वर खरात हा फरार झाला. या आरोपीजवळील रोख १३ हजार ४७० रुपये हस्तगत करण्यात आले. यात आरोपींमध्ये एक डॉक्टर व शिक्षकाचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन दाभाडे ,पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ नरके व विलास खराडे, कैलास पोटे, रफीक निनसुरवाले, संदीप मोरे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक सचिन दाभाडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
कारवाई झाली असलीतरी क्लबचालक , ग्रामपंचायतच्या दोन आजी - माजी सदस्यांना व दोन शिक्षकांना पोलिसांनी सोडून दिल्याची चर्चा तालखेड परिसरात होती. याबाबत ग्रामीण ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ नरके यांनी सांगितले की , आम्ही तेथे दिसताच अनेक जण उसाच्या शेतातून पळून गेले, त्यामुळे काही जणांना पकडता आले नाही.