कोरडेवाडीत जुगार अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:34 AM2021-04-08T04:34:02+5:302021-04-08T04:34:02+5:30
बीड : केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरडेवाडी परिसरात जुगार खेळणाऱ्यांवर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने कारवाई केली. ...
बीड : केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरडेवाडी परिसरात जुगार खेळणाऱ्यांवर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने कारवाई केली. यावेळी १० जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. केज पोलिसांचे मात्र जुगार अड्ड्यांकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. जमावबंदीसारखे कायदे लागू आहेत, तरीदेखील जुगारी मोठ्या प्रमाणात एकत्र येत जुगार खेळत आहेत. केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील शिवारात काही जण तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथक प्रमुख विलास हजारे यांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकून, केज तालुक्यातील कोरडेवाडी शिवारातील सुदाम भागुजी वरपे यांच्या शेतात धाड टाकली असता, तेथे १० जुगारी तिर्रट खेळताना आढळून आले. त्यामध्ये बापुराव राजाराम यादव (कोरडेवाडी), बाळासाहेब गणपती राख (कोरडेवाडी), महेंद्र सोपान यादव (कोरडेवाडी), शिवाजी सुदाम वरपे (कोरडेवाडी), गोविंद नवनाथ आव्हाड (देवगाव), दत्तात्रय निवृत्ती कुटे (विडा ता. केज), नारायण केरबा वाघमारे (रा. विडा), भगवान सीताराम कोरडे (कोरडेवाडी), सुग्रीव सांगळे (आंधळेवाडी), सुदाम भागुजी वरपे (कोरडेवाडी) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्यांच्याकडून ५२ हजार ७५०, मोबाइल व मोटारसायकल असा एकूण २ लाख ५० हजार ७५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास केज पोलीस करीत आहेत.