सावकाराच्या घरावरच छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:31 AM2021-01-22T04:31:10+5:302021-01-22T04:31:10+5:30

अंबाजोगाई : सेवानिवृत्त सैनिकाच्या तक्रारीवरून परळीच्या सहायक निबंधकांनी छापा टाकून एका खासगी सावकाराच्या घरातून मुद्रांकांसह धनादेश जप्त केले. ही ...

Raid the lender's house | सावकाराच्या घरावरच छापा

सावकाराच्या घरावरच छापा

Next

अंबाजोगाई : सेवानिवृत्त सैनिकाच्या तक्रारीवरून परळीच्या सहायक निबंधकांनी छापा टाकून एका खासगी सावकाराच्या घरातून मुद्रांकांसह धनादेश जप्त केले. ही कारवाई बुधवारी (दि. २०) अंबाजोगाई येथील फ्लॉवर्स क्वार्टर परिसरात करण्यात आली. याप्रकरणी सावकार पिता-पुत्रावर शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

चनई (ता. अंबाजोगाई) येथील माजी सैनिक शेख गुलाब शेख बाबू यांनी खासगी सावकाराविरूध्द जिल्हा निबंधकांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार खासगी सावकार घनश्याम घोबाळे हा अवाच्या सव्वा व्याज लावून जागा हडप करू पाहात असल्याचे नमूद होते. या तक्रारीआधारे जिल्हा निबंधकांनी कारवाईचे आदेश दिले. परळी येथील सहायक निबंधक नितीन पंडित यांचे पथक यासाठी स्थापन करण्यात आले होते. पंडित यांच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने बुधवारी घनश्याम एकनाथ घोबाळे (रा. फ्लॉवर्स क्वार्टर, अंबाजोगाई) यांच्या घरावर छापा टाकला. सहायक निबंधक नितीन पंडित यांच्या फिर्यादीवरून घनश्याम एकनाथ घोबाळे व विशाल घनश्याम घोबाळे यांच्याविरूध्द महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ कलम ३९ व कलम ४५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सहायक निबंधक पंडित यांच्यासह सहकार अधिकारी एस. एम. वाव्हळे, एस. ए. डावकर, सहायक सहकार अधिकारी आर. जी. तडवळकर, शिपाई एच. एम. पठाण व शहर ठाण्यातील पोलीस अंमलदार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सुटकेस भरून कागदपत्रे

घोबाळे याच्या घरातील एका सुटकेसमध्ये सात जणांचे मुद्रांक, खरेदीखत, धनादेश व इतर टिपण्या आढळून आल्या. या टिपण्यात व्याजाने दिलेल्या रकमेच्या नोंदीही आढळल्या. या सर्व कागदपत्रांवरून घोबाळे हा अवैध सावकारीचा व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले.

Web Title: Raid the lender's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.