बीडमध्ये कुंटणखान्यावर छापा; आंटीसह दलाल ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 04:54 PM2019-04-07T16:54:47+5:302019-04-07T16:56:14+5:30
दोन पीडित महिलांचीही केली सुटका : शिवाजीनगर पोलिसांची कारवाई
बीड : बीड शहरातील जिजाईनगर भागात राहत्या घरात चालणाऱ्या कुंटणखान्यावर शिवाजीनगर पोलिसांचा रविवारी दुपारी अचानक छापा टाकला. यामध्ये कुंटणखाना चालविणाऱ्या आंटीसह एका दलालाही ताब्यात घेतले. त्यानंतर दोन पीडित महिलांचीही सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
अश्विनी राजु सोळंके (२८ रा.बीड), दिपक ज्ञानोबा रत्नपारखी (२६ रा.बीड) अशी ताब्यात घेतलेल्या आंटी व दलालाचे नाव आहे. अश्विीनीने बार्शी रोडवरील जिजाईनगर भागात जानेवारी महिन्यात एक घर किरायाने घेतले होते. पहिले पंधरा दिवस वातावरण पाहिल्यानंतर तिने दिपकच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय सुरू केला. दीपकने ग्राहक आणायचे आणि अश्विनीने महिलांची जुळवाजुळव करायची, असा काहीसा प्रकार त्यांचा सुरू होता.
हीच माहिती शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ आपल्या पथकामार्फत सापळा लावला. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक छापा टाकला. यामध्ये दीपक व अश्विनीला ताब्यात घेतले. तर बीडमधीलच दोन २५ महिलांची यातून सुटका करण्यात आली. त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोनि पुरभे यांनी सांगितले. पुरभे यांच्यासह पोह खेडकर, प्रधान, आनवणे, सय्यद, सपकाळ यांचा कारवाईत समावेश होता.