राजकीय वरदहस्त असलेल्या जुगार अड्ड्यांवर बीडमध्ये छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 05:21 PM2020-07-20T17:21:11+5:302020-07-20T17:22:55+5:30
जुगार अड्डा शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या जागेतील पत्र्याच्या बंद शेडमध्येच सुरु असल्याचे समोर आले आहे. मात्र, खांडे यांनी या व्यवसायाशी आपला संबंध नसल्याचा खुलासा केला
बीड : शहरातील फुलाईनगर परिसरात, तसेच नामलगाव फाट्यावरील एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री आणि रविवारी दुपारच्या सुमारास छापा मारला. सलग दोन दिवस राजकीय वरदहस्त असलेल्या जुगार अड्ड्यांवर झालेल्या कारवाईमुळे अवैध धंद्येवाल्यांचे धाबे दणाणले आहे.
शनिवारी रात्री साडेसात वाजता बीड शहरातील फुलाईनगर भागातील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यात २८ जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान हा जुगार अड्डा शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या जागेतील पत्र्याच्या बंद शेडमध्येच सुरु असल्याचे समोर आले आहे. मात्र, खांडे यांनी या व्यवसायाशी आपला संबंध नसल्याचा खुलासा करत ही जागा आपण भाडेतत्वार दिली होती, असा खुलासा केला आहे.
पोलिसांनी जुगार अड्ड्यावरुन एका लाख २५ हजार ५४० रुपयांची रोकड, ३१ हजार ४० रुपयांचे ९ मोबाईल असा एकूण एक लाख ५६ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक प्रमुख सहायक निरीक्षक आनंद कांगुणे व बीड शहर पोलीस ठाणे प्रमुख गजानन जाधव व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या केली. अवैध धंद्यांच्या संदर्भात पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. त्या अनुषंगाने त्यांनी पथकांना कारवाईचे आदेश दिले होते.
माझ्या बदनामीचा डाव -कुंडलिक खांडे
शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी ही जागा आपल्या मालकीची असली तरी २४ जून २०२० रोजी तीन महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर सुभाष बापमारे यांना दिली होती, असा खुलासा केला आहे. या जागेतील व्यवसायाशी आपला संबंध नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आपली बदनामी करण्याचा हा डाव असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.