मोकळ्या शिवारातील जुगार अड्यावर धाड; 21 जुगारी ताब्यात, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 06:50 PM2021-03-09T18:50:45+5:302021-03-09T18:51:06+5:30
पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकांची कारवाई
कडा ( बीड ) : बाळेवाडी शिवारात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकांने सोमवारी रात्री कारवाई केली. पोलिसांनी 21 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच 11 लाख 53 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे पकडलेल्या जुगाऱ्यांमध्ये शहरातील प्रतिष्ठितांसोबत काहीजण राजकीय पार्श्वभूमीचे आहेत.
आष्टी तालुक्यातील बीड नगर रोडलगत असलेल्या बाळेवाडी शिवारात मोकळ्या जागेत काही लोक जुगार खेळत होते. याची माहिती पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाला सोमवारी रात्री मिळाली. यावरून त्यांच्या पथकाने बाळेवाडी शिवारात धाड टाकून २१ जुगारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, वाहने, रोकड असा 11 लाख 53 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जुगार खेळत असलेले आरोपी शिवाजी गर्जे, संजय वाल्हेकर, हनुमंत बुध्दीवंत, नवनाथ रोडे, ज्ञानदेव गांगुर्डे, बाळासाहेब राळेभात,राजेंद्र शेळके, बंडु वायभासे, दिनकर नागरगोजे, गणेश दिघे, चंद्रभान लोंखडे, खंडागळे ,लहु माने, सुधाकर तारू, विकास म्हस्के, सोनु औटे, राजु उमरे, सुभाष फुलमाळी, केशव उदावंत, बंडाले, शिवाजी काळे आदींवर पोलिस शिपाई संभाजी भिल्लारे याच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्टी तालुक्यातील या धाडीत राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व प्रतिष्ठित लोक असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पुढील तपास ए.एस.आय. शिवाजी नागरगोजे करीत आहेत.