माजलगाव धरणाच्या ११ दरवाज्यातून ८० हजार क्युसेस विसर्ग, अनेक गावांमध्ये पाणी शिरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 09:52 AM2021-09-28T09:52:15+5:302021-09-28T09:53:07+5:30
Majalgaon Dam : एक गावचा संपर्क तुटला तर अनेक गावात शिरले पाणी
माजलगाव : माजलगाव तालुक्यात धरण क्षेत्रात मागील 3-4 दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने सकाळ पासुन धरणात पाण्याची मोठी आवक येत असल्याने मंगळवारी 11गेट दीड ते दोन मीटरने उघडले असून याद्वारे 80 हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे दुसऱ्यांदा सांडस चिंचोलीचा संपर्क तुटला असून अनेक गावात पाणी शिरले आहे.
माजलगाव तालुक्यासह धरणाच्या वरील भागात मागील 3-4 दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे.यामुळे शुक्रवार पासुन धरणाचे नऊ गेट उघडले होते. परंतु धरणात येणाऱ्या पाण्याची आवक जास्त असल्याने रविवारी सकाळ पासुन 11 गेट दिड मिटरने उघडण्यात आले. सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने मंगळवारी सकाळपासुन या 11 गेटद्वारे 80 हजार 534 क्युसेक्स पाणी सिंदफना नदीपात्रात सोडण्यात आले होते.यामुळे तालुक्यातील सांडस चिंचोलीचा पुन्हा सकाळपासून संपर्क तुटला असुन गावात जाणाऱ्या फुलावर 10 फुटापेक्षा जास्त पाणी होते. त्याच बरोबर गोविंदपुर , डेपेगाव व लुखेगावात पाणी शिरले आहे.यावर प्रशासन लक्ष ठेवुन असल्याचे प्रभारी तहसीलदार अशोक भंडारे यांनी सांगितले आहे.
माजलगाव धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर पैठणचे धरण देखील लवकरच भरण्याची शक्यता निर्माण झाल्याने सिंदफणा नदी पात्रात लगतच्या गावासह गोदावरी नदी पात्रा कडीच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
---अशोक भंडारे ,प्रभारी तहसीलदार