बीड जिल्हाभरात पाऊस ७९ टक्के, धरणांमध्ये पाणीसाठा केवळ १८ टक्केच

By शिरीष शिंदे | Published: October 2, 2023 06:42 PM2023-10-02T18:42:20+5:302023-10-02T18:44:15+5:30

धरण क्षेत्र परिसरात पाऊस झाला नसल्याचा परिणाम

Rainfall in Beed district is 79 percent, water storage in dams is only 18 percent | बीड जिल्हाभरात पाऊस ७९ टक्के, धरणांमध्ये पाणीसाठा केवळ १८ टक्केच

बीड जिल्हाभरात पाऊस ७९ टक्के, धरणांमध्ये पाणीसाठा केवळ १८ टक्केच

googlenewsNext

बीड : मान्सूनचा चार महिन्यांचा हंगाम संपला असून या कालावधीत एकूण ७९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्या तुलनेत जिल्ह्यातील १४३ लहान-माेठ्या पाणीसाठा प्रकल्पात केवळ १८ टक्केच पाणीसाठा झाला आहे. सरासरीच्या तुलनेत झालेला बहुतांश पाऊस हा मुर स्वरुपाचा असल्याचे मानले जात आहे. धरण क्षेत्र परिसरात पाऊस झाला नसल्याने पाणीसाठा अत्यल्प झाला असल्याचा अंदाज आहे. आता, सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे डोळे परतीच्या पावसाकडे लागले आहेत.

जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पेरण्या रखडल्या होत्या. जुलै महिन्याच्या अखेरीस बऱ्यापैकी पावसाला सुरुवात झाली होती. परिणामी याच काळात पेरणीची टक्केवारी वाढली. बीड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात २०२३-२४ मध्ये एकूण ७ लाख ८२ हजार ३०८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ही पेरणी जिल्ह्याच्या सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ९९.५६ टक्के आहे. पावसाच्या खंडामुळे सोयाबीन, मूग व उडीद पिकाची उत्पादकता घटण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली होती. दरम्यान, गणपती बाप्पांच्या आगमनानंतर पावसाला सुरुवात झाली होती. त्यानंतर चांगल्या पावसाला सुरुवात झाली. मुर स्वरूपाच्या पावसाने सरासरी पावसाची टक्केवारी ५० टक्क्यांवरून थेट ७९.१ टक्क्यांवर जाऊन पाेहोचली. हा पाऊस पिकांना जीवनदान देणारा ठरला. परंतु धरणांसाठी लाभदायक ठरला नाही.

आता परतीच्या पावसावर मदार
मागील काही वर्षांचा मागोवा घेतला तर परतीच्या पावसाने सर्व धरणे काही दिवसांत किंवा एकाच दिवसात भरून गेल्याचे लक्षात येईल. २०१६-१७ मध्ये बीडमध्ये एकाच रात्री झालेल्या पावसामुळे सर्वच्या सर्व धरणे भरून गेली असल्याचा अनुभव बीडकरांना आहे. आतापर्यंत चांगला पाऊस झाला तरी पाणीसाठा नसल्याची परिस्थिती परतीच्या पावसामुळे बदलून जाऊ शकते असा विश्वास अनेक शेतकऱ्यांना आहे. केवळ बीड जिल्हाच नाही तर राज्यात परतीच्या पावसाचा मोठा प्रभाव असतो.

प्रकल्प-उपयुक्त पाणीसाठा (दलघमी)-टक्केवारी

माजलगाव-परळी विभाग-३९.२००-१२.५६

बीड विभाग-८.८८४-३३.९५

परळी विभाग-२१.८८-२७.३९

मध्यम प्रकल्प-१७.१४२-३७.३९

लघु प्रकल्प-१९.५२३-४४.८७

सर्व प्रकल्प- १३२.६१२-१८.५३

 

आतापर्यंत झालेला पाऊस

तालुका-वार्षिक सरासरी-आतापर्यंतचा पाऊस-टक्केवारी

बीड-५९४.५-४२३.३-७०.९

पाटोदा-५३८.७-४३०.७-७९.७

आष्टी-५४६.१-५१४.२-९३.७

गेवराई-५८७.०-३६२.४-६१.५

माजलगाव-६१६.९-४३४.९-७०.२

अंबाजोगाई-६३२.४-६०१.४-९४.७

केज-५८३.६-५६५.७-९६.६

परळी-६२८.१-३६८.४-५८.४

धारुर-६६९.८-४६८.४-६९.७

वडवणी-६००.७-३६०.५-५९.८

शिरुर-५१५.६-३९४.७-७६.२

एकूण-५६६.१-४४९.२-७९.०

 

बिंदुसरा धरणात १९ टक्के पाणीसाठा

माजलगाव प्रकल्पात १२.५६ टक्के, तालुक्यातील पाली येथे बिंदुसरा धरणात सद्स्थितीला १८.९१ टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. शिरुर तालुक्यातील सिंदफणा प्रकल्पात ५७.३७ टक्के तर पाटोदा तालुक्यातील महासांगवी प्रकल्पात ५६.३९ टक्के पाणीसाठा असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

 

Web Title: Rainfall in Beed district is 79 percent, water storage in dams is only 18 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.