पावसामुळे पिकांना मिळाली संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:37 AM2021-08-24T04:37:49+5:302021-08-24T04:37:49+5:30
अंबाजोगाई : अनेक दिवस दडी मारल्यानंतर तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने कोमेजलेल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. ...
अंबाजोगाई : अनेक दिवस दडी मारल्यानंतर तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने कोमेजलेल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
तालुक्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीनसह इतर पिके कोमेजली होती. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, अशांनी पाणी देऊन पिके वाचविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यातही विजेचा अडसर होताच. पावसाअभावी सोयाबीन पीक पूर्णत: वाया जाणार असल्याचे दिसत होते. कापूस व सोयाबीन पिकांवर विविध पिकांवर कीड व अळ्यांनी आक्रमण केले आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता शेतकरी महागडे कीटकनाशकाची फवारणी करून पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अंबाजोगाई तालुक्यात फुलोऱ्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीनच्या पिकाला मागील दोन आठवड्यांपासून दडी मारून बसलेला पाऊस कमी-अधिक प्रमाणात बरसत असल्याने जीवनदान मिळाले आहे. मागील पंधरवड्यातील अपवाद वगळता समाधानकारक पाऊस झाला असल्याने सोयाबीन आणि इतरही पिके आता बहरात आहेत. सोयाबीन पिकावर काही प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव झाल्याने कीड़नाशकांची फवारणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. तालुक्यात चांगला पाऊस पडत असल्याने पिकास संजीवनी मिळाली आहे. तसेच अनेक सिंचन प्रकल्पांतही पावसामुळे जलसाठा वाढला आहे.
...तर साकार होईल हिरवे स्वप्न
तालुक्यात खरीप हंगामात ५५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रांत सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे. मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने फुलोऱ्याच्या अवस्थेतील सोयाबीन पीक अनेक ठिकाणी कोमेजले होते. दिवाळीपश्चात सोयाबीनच्या किमती गगनाला भिडल्याने शेतशिवारात डौलाने उभ्या असलेल्या सोयाबीनमुळे यावर्षी चांगले उत्पन्न होण्याची हिरवे स्वप्न शेतकरी पाहत आहेत. निसर्गाने साथ दिल्यास मागील वर्षाप्रमाणे याहीवर्षी सोयाबीनचे विक्रमी पीक तालुक्यात होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.