रुग्णालय पातळीवर उभारा हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:32 AM2021-05-17T04:32:50+5:302021-05-17T04:32:50+5:30
बीड : जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन पुरवठा हा गंभीर विषय झाला होता. आजच्या घडीला मागणी आणि पुरवठ्याची तोंडमिळवणी सुरू ...
बीड : जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन पुरवठा हा गंभीर विषय झाला होता. आजच्या घडीला मागणी आणि पुरवठ्याची तोंडमिळवणी सुरू असली तरी तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो हे लक्षात घेऊन खासगी रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाच्या पातळीवर हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे प्रकल्प उभारावेत असे पत्र बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्ह्यातील ७५ रुग्णालयांना दिले आहे.
बीड जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा प्रश्न अधिकच गंभीर झाला होता. ऑक्सिजन पुरवठा कमी पडत असल्याने अनेक रुग्णालयावर रुग्णांना इतरत्र हलविण्याची वेळ आली होती. देशात अनेक ठिकाणी असाच प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालये आणि उच्च न्यायालयांनी शास्वत ऑक्सिजन पुरवठ्यावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्ह्यातील तब्बल ७५ खासगी रुग्णालयांना पत्र लिहिले आहे. यात कोरोनाची पुढची लाट लक्षात घेऊन रुग्णालयाच्या पातळीवर प्रत्येकाने वेगळे किंवा काही रुग्णालयांनी एकत्रित येऊन हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे प्रकल्प (पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांट) उभारावेत अशा सूचना केल्या आहेत. येत्या काही दिवसात रुग्णालयांनी हे प्रकल्प कार्यान्वित होतील हे पाहावे अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या काळात ज्या खासगी रुग्णालयांनी कोविड सेवा सुरु केली आहे त्यांच्यासह इतर रुग्णालयांना हे पत्र देण्यात आले आहे.