मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 03:03 PM2024-09-25T15:03:53+5:302024-09-25T15:28:43+5:30
शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केल्याचं बोललं जात आहे.
Parli Vidhan Sabha ( Marathi News ) : राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी युवा प्रदेशाध्यक्ष , परळी तालुक्यातील सक्रिय कार्यकर्ते राजेभाऊ फड यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर परळीचे आमदार असलेल्या धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ दिली. त्यामुळे या मतदारसंघात शरद पवार हे नवीन चेहऱ्याच्या शोधात असून इतर पक्षातील नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर आज राजेभाऊ फड यांना पक्षात घेत पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केल्याचं बोललं जात आहे.
मुंबईत आज शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, खासदार सुप्रिया सुळे,आमदार जितेंद्र आव्हाड , आमदार रोहित पवार, बीड जिल्ह्यातील खासदार बजरंग सोनवणे, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत राजेभाऊ फड यांनी आपल्या समर्थकांसह हाती तुतारी घेतली.
कोण आहेत राजेभाऊ फड?
राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवा प्रदेशाध्यक्षपदी राहिलेले राजेभाऊ फड हे कन्हेरवाडी गावचे सरपंच आहेत. तसंच त्यांनी परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालकपदही भूषवलेलं आहे. परळी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवण्यास ते इच्छुक आहेत. त्यांना शरद पवारांकडून तिकीट दिलं जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.