कोरोना महामारी लक्षात घेत रमजान ईद साधेपणाने साजरी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:34 AM2021-05-13T04:34:10+5:302021-05-13T04:34:10+5:30
बीड : ‘ब्रेक द चेन’ आदेशानुसार सध्या कडक निर्बंध तसेच जमावबंदी व संचारबंदी लागू असून कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय ...
बीड : ‘ब्रेक द चेन’ आदेशानुसार सध्या कडक निर्बंध तसेच जमावबंदी व संचारबंदी लागू असून कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय किंवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एकत्र येण्यास मज्जाव घालण्यात आलेला आहे. कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईदकरिता मुस्लिमबांधवांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपआपल्या घरात करून शासनाच्या आदेशाचे पालन करणे उचित ठरेल, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी संतोष राऊत यांनी केले आहे. नमाज पठणासाठी सार्वजनिक ठिकाणी किंवा मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये. रमजान ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करू नये. धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लिम समाजातील धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही राऊत यांनी केले.
-----
हस्तांदोलन, गळाभेट टाळा, सलाम करा
१४ मे रोजी रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. कोरोनामुळे शासन-प्रशासनाच्या निर्णयाला अनुसरून ईदगाहवर नमाज पठण करण्यास मनाई केली आहे. आपल्या पातळीवर नमाज पठण करावी. त्यानंतर घराबाहेर पडून हस्तांदोलन किंवा गळाभेट टाळावी. सुरक्षित अंतर ठेवून सलाम करावा. कोरोना महामारी लक्षात ठेवून ईदच्या शुभेच्छांचे आदान-प्रदान करावे.
- हसीन अख्तर, जिल्हाध्यक्ष - तामीर ए मिल्लत, बीड.
---
चौदा महिन्यांपासून कोरोनाला तोंड देत आहोत. लॉकडाऊनमुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. अशा वातावरणात शासन-प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच आपआपल्या घरी ईद साजरी करून स्वतःची काळजी घ्यावी आणि इतरांची काळजी ठेवावी.
- प्रा. शफिक हाशमी, जिल्हाध्यक्ष,जमाअत ए इस्लामी हिंद, बीड.
--------
शासन-प्रशासनाने अधोरेखित केलेले पथ्य पाळून रमजान ईद साजरी करावी. संसर्ग होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. सर्वांनी मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सचा वापर करावा. ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःच्या प्रकृती कडे लक्ष द्यावे. तरुणांनीही मर्यादेचे भान लक्षात ठेवून पालन करावे.
- जकरिया मदनी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, बीड.
--------
कोरोना महामारीवर नियंत्रणासाठी शासनाने निर्गमित केलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून राज्य शासन, जिल्हा प्रशासनाला नागरिक शंभर टक्के सहकार्य करतील यात तीळमात्र शंका नाही. ईदच्या या पवित्र वेळेवर कोरोना महामारीपासून आम्हा भारतवासीयांना लवकरात लवकर सुरक्षित करावे, अशी आपण अल्लाहजवळ प्रार्थना करूया.
- प्रा. सिराज खान आरजू, शिक्षणतज्ज्ञ,बीड.
---------