बीडमध्ये अधिकाऱ्यांसमोरच रेमडेसिवीरचा 'काळा बाजार'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:34 AM2021-04-16T04:34:36+5:302021-04-16T04:34:36+5:30
बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार अधिकाऱ्यांसमोरच झाल्याचे समोर आले आहे. एका इंजेक्शनसाठी रात्रभर नातेवाईक ...
बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार अधिकाऱ्यांसमोरच झाल्याचे समोर आले आहे. एका इंजेक्शनसाठी रात्रभर नातेवाईक रांगा लावून उभा आहेत तर अधिकारी हे विकण्याची परवानगी दिलेल्या मेडिकल चालकांशी मिलीभगत करून या इंजेक्शनची चढ्याभावाने विक्री करीत असल्याचे समोर आले आहे. याप्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सध्या तरी रेमडेसिवीर इंजेक्शन प्रभावी ठरत असल्याने मागणी वाढली आहे. खाजगी रूग्णालयात उपचार घेणाऱ्यांना हे इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत. खाजगी डॉक्टरही पत्र नातेवाईकांच्या हाती देऊन अंग काढून घेत आहेत. त्यामुळे इंजेक्शन मिळविण्यासाठी नातेवाईकांची धावपळ होत आहे. एकीकडे आगोदरच कोरोनाला थकलेल्या नातेवाईकांची रेमडेसिवीर विक्रीची परवानगी असलेले मेडिकलचालक लूट करत आहेत. शासनाने १६०० रूपयांपर्यंतच शुल्क आकारण्याबत सुचना करूनही बीडमध्ये तब्बल ५ हजार ४०० रूपयांना इंजेक्शन विक्री केले जात आहे. हा सर्व प्रकार औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे यांच्यासमोरच बुधवारी रात्री झाल्याचे समोर आले आहे. ज्या मेडिकलमधून जादा दराने इंजेक्शन दिले जात होते, तेथेच ते रात्री ठाण मांडून असल्याचे समोर आले आहे. याबाबत नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच आपण याबाबत न्यायालयातही धाव घेणार असल्याचे नाईकवाडे यांनी म्हटले आहे.
कोट
रेमडेसिवीर इंजेक्शन १४०० किंवा १६०० रूपयांनाच द्यावे, असे कोणतेही परिपत्रक नाही. एमआरपीनुसार जी किंमत आहे, त्याप्रमाणे इंजेक्शन विक्री केले आहे.
रामेश्वर डोईफोडे, औषध निरीक्षक, बीड