रमेश आडसकरांचा विरोधकांना ‘हाबाडा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 12:23 AM2019-10-08T00:23:14+5:302019-10-08T00:24:03+5:30
उमेदवारी अर्ज दाखल करताना भव्य रॅली काढून भाजपाचे उमेदवार रमेश आडसकर यांनी सलामीलाच विरोधकांना ‘हाबाडा’ दिला आहे.
पुरुषोत्तम करवा।
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : माजलगाव विधानसभा निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २५ एवढे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले. वंचितच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाल्याने या निवडणुकीत आता भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्येच खरी लढत होणार असल्याने येथील निवडणूक अटीतटीची होईल, असे चित्र आज तरी दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना भव्य रॅली काढून भाजपाचे उमेदवार रमेश आडसकर यांनी सलामीलाच विरोधकांना ‘हाबाडा’ दिला आहे. भाजपाच्या या विराट रॅलीचीच माजलगाव मतदारसंघात जिकडे तिकडे चर्चाच चर्चा चालू आहे.
माजलगाव मतदार संघात माजलगावसह धारूर व वडवणी तालुका येतो. माजलगाव तालुक्यातील १२१, धारूर तालुक्यातील ४५ व वडवणी तालुक्यातील ६८ गावांचा समावेश आहे. या मतदारसंघात ३ लाख ३१ हजार १० एवढे मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीपेक्षा २ हजार ८४६ नवीन मतदारांची संख्या वाढली. यासाठी विधानसभा निवडणुकीसाठी ६४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १४ उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाले होते.अपक्ष उमेदवारांचा आपल्याला किंवा विरोधकांना फायदा-तोटा होईल हे पाहुन अपक्षांची मनधरणी दोन दिवसांपासून भाजप - राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांकडून करण्यात येत होती. त्यात अनेक अपक्षांचे उमेदवारी अर्ज काढण्यात ते यशस्वी देखील झाले. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर या मतदारसंघात एवढे उमेदवार शिल्लक राहिले.
या मतदारसंघात मुख्य लढत भाजप - शिवसेना व मित्र पक्षाचे उमेदवार रमेश आडसकर व राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार प्रकाश सोळंके यांच्यातच होईल, असे चित्र आज तरी पहावयास मिळत आहे. आडसकर हे मोहन जगताप व ओमप्रकाश शेटे यांचे मन वळविण्यात यश्स्वी झाले आहेत. भाजपाची जुनी फळी आ. आर.टी. देशमुख यांच्यापासून दुरावली होती, आता त्यांना सोबत घेऊन फिरत असल्याने त्याचा फायदा आडसकरांना होऊ शकतो. विरोधकांना आडसकर यांच्या विरोधात पाहिजे, असा ठोस मुद्दा मिळालेला नाही तर राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील अनेक जण भाजपासोबत गेल्याने तसेच आडसकर यांचा धारूर तालुक्यात संपर्क चांगला असल्याचा फायदा आडसकरांना होऊ शकतो. आडसकरांचा स्वभाव हा सर्वात मिसळून राहण्याचा असल्याने आडसकर यांच्याभोवतीची कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची फौज दिवसेंदिवस वाढतच आहे.
पदाधिकारी भाजपत गेल्याने अडचणी
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रकाश सोळंके यांनी आतापर्यंत पाच वेळा विधानसभा निवडणूक लढवली असून, त्यापैकी तीन वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी १५ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी राज्यमंत्री पद देखील भुषवले होते.
चिडचिड्या स्वभावामुळे नागरिक त्यांना बोलण्यास धजावत नाहीत. मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसºया फळीतील नेते व प्रकाश सोळंके यांचे नातेवाईक भाजपात गेल्याने त्यांची अडचण झाली. ही निवडणूक त्यांच्यासाठी कसोटीची दिसत आहे.