मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये रणरागिणींचा सरकारवर हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 11:20 PM2018-08-06T23:20:56+5:302018-08-06T23:21:43+5:30
मराठा समाजाला तात्काळ आरक्षण लागू करावे या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी सोमवारी दुपारी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यामध्ये हजारोंच्या संख्येने युवती, महिला सहभागी झाल्या होत्या.
बीड : मराठा समाजाला तात्काळ आरक्षण लागू करावे या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी सोमवारी दुपारी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यामध्ये हजारोंच्या संख्येने युवती, महिला सहभागी झाल्या होत्या. हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन निघालेल्या मोर्चात महिलांनी दिलेल्या घोषणांनी बीड शहर दणाणून गेले होते. अतिशय शिस्तबद्ध असलेला हा मोर्चा शांततेत पार पडला.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासह शासकीय नोकरीतील मेगाभरती रद्द करा, मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घ्या, मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या युवक, युवतींना शहीद घोषित करा, मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तात्काळ चालू करा, अण्णासाहेब पाटील महामंडळास केलेल्या आर्थिक तरतुदीची तात्काळ अंमलबजावणी करा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा यासारख्या विविध मागण्यांसाठी बीड जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा मोर्चा काढण्यात आला.
वाहतुकीसाठी एक मार्ग खुला ठेवावा
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर एका बाजूने मोर्चेकºयांनी बसावे, दुसºया बाजूने वाहतुकीसाठी मार्ग खुला ठेवावा. यामुळे मोर्चाही शिस्तबद्ध व शांत वाटेल तसेच सर्वसामान्य वाहनधारकांचे हाल होणार नाहीत. यापुढे मोर्चेकºयांनी याची काळजी घेण्याची गरज आहे.
माजलगावात ठिय्या सुरुच
माजलगांव : आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास सोमवारी सहा दिवस झाले असून, ठिय्या आंदोलन सुरूच आहे. माजलगाव काँग्रेस, अल्पसंख्यांक काँग्रेस व युवक काँग्रेसने आंदोलनास पाठिंबा जाहर केला.
पोलिसांकडून तगडा बंदोबस्त
कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या दृष्टीने बीड पोलिसांकडून ठिकठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महिलांचा मोर्चा असल्याने जिल्ह्यातील सर्व महिला अधिकारी, कर्मचाºयांना मोर्चाच्या बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले होते.
आठ दिवसाला रक्तदान करा
केज : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी रक्तदान आंदोलन करण्यात येणार आहे. संकलित केलेले रक्त केवळ चाळीस दिवसच टिकते. नंतर टाकून द्यावे लागते. त्यामुळे अतिरिक्त रक्त जमा होऊ नये व आपल्या रक्ताचा उपयोग व्हावा यासाठी एकाच दिवशी रक्तदान न करता आठ दिवसाला एकदा रक्तदान करा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी केज येथे ठिय्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आल्यानंतर केले. आरक्षणाच्या मागणीसाठी युवकांनी आत्महत्या करु नयेत, असे आवाहन केले. यावेळी अंकुश इंगळे, दिलीप गुळभिले, भाई मोहन गुंड, विलास जोगदंड, मुकुंद कणसे, विनोद गुंड, बालासाहेब गलांडे, राम माने, पशुपतीनाथ दांगट, अमर पाटील, धनंजय देशमुख आदींची उपस्थिती होती.
गेवराईपर्यंत दुचाकी रॅली
गेवराई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी येथील शास्त्री चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. रविवारी रात्री येथे भजन, कीर्तन झाले. सोमवारी चौथ्या दिवशी तालुक्यातील पाचेगाव आणि उमापूर सर्कल परिसरातील गावांतून तरूणांनी घोषणाबाजी गेवराईपर्यंत दुचाकी रॅली काढली. यात ७० पेक्षा जास्त युवक सहभागी झाले होते.
ब्राह्मण समाजाचा पाठिंबा
केज : मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास केज ब्राह्मण संघटनेने जाहीर पाठिंबा दिला. यावेळी धनंजय कुलकर्णी यांनी निवेदन केले. यावेळी ब्राह्मण संघटनेचे सतीश केजकर, श्रीनिवास केजकर, चंद्रकांत पाटील, बाळासाहेब कुलकर्णी उमरीकर आदी उपस्थित होते.
४० आंदोलकांना जामीन मंजूर
गेवराई : मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी गेवराईत अर्धनग्न आंदोलनानंतर भाजपा आ. लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर आंदोलकांनी ठिय्या देऊन सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर झालेल्या दगडफेक प्रकरणी सुमारे ५२ व्यक्तिंसह ४० अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. यापैकी ४० जणांना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी अटकपुर्व जामीन मंजूर केला. जिल्हा न्यायालयातील वकिलांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून हे प्रकरण नि:शुल्क लढविले.
केजमध्ये चौथ्या दिवशीही ठिय्या
केज : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी केज येथे चौथ्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरू होते. या आंदोलनात तालुक्यातील उंदरी व गांजी येथील सकल मराठा समाज सहभागी झाला. उंदरी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. आंदोलनात ज्येष्ठ नागरिकांसह तरूणांचा सहभाग होता.