रणजीत कासलेचे पाय आणखी खोलात; ईव्हीएम मशीनवरील बेताल वक्तव्यावर परळीत गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 18:45 IST2025-04-19T18:45:25+5:302025-04-19T18:45:55+5:30
नायब तहसीलदार आण्णा वंजारे यांनी परळी पोलिस ठाणे गाठत कासले विरोधात तक्रार दिली.

रणजीत कासलेचे पाय आणखी खोलात; ईव्हीएम मशीनवरील बेताल वक्तव्यावर परळीत गुन्हा
बीड : माझ्या बँक खात्यावर १० लाख रूपये पाठवून ईव्हीएम मशीन पासून दुर रहायचे, गप्प रहायचे असे एका व्हिडीओतून बेताल वक्तव्य करणे बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले याच्या अंगलट आले आहे. परळी शहर पोलिस ठाण्यात निवडणूक विभागाचे नायब तहसीलदारांनी त्याच्याविरोधात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे कासलेचे पाय आणखीनच खोलात गेले आहेत.
विधानसभा निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होऊन २३ नोव्हेंबर रोजी लगेच निकाल लागला. ही सर्व प्रक्रिया शांततेत पार पडली. परंतू बीडच्या सायबर पोलिस ठाण्यातील बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले याने आपले निलंबन झाल्यानंतर अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केले. यातील एकामध्ये तो २१ नोव्हेंबर २०२४ रोजी आपल्या बँक खात्यावर १० लाख रूपये आल्याचे सांगतो. हे पैसे निवडणूक प्रक्रियेतील ईव्हीएम मशीनपासून दुर राहणे, मशीनमधील छेडछाड होत असताना गप्प बसायचे व सहन करायचे, यासाठी दिल्याचा दावा केला. यांनी अशाच प्रकारे निवडणूका जिंकल्या असून पूर्ण सरकारच असेच निवडून आल्याचे म्हटले होते.
याच अनुषंगाने परळीचे नायब तहसीलदार आण्णा वंजारे यांनी परळी पोलिस ठाणे गाठत कासले विरोधात तक्रार दिली. लोकसेवक असतानाही आणि कायद्याचे ज्ञान असतानाही, असे बेताल वक्तव्य केल्याने कासलेविरोधात १९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता गुन्हा दाखल झाला आहे.