रानमेवा : बालाघाटाच्या डोंगरातील सीताफळे धारुरच्या आठवडी बाजारात, प्रक्रिया उद्योगाअभावी भाव मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:28 AM2017-10-28T11:28:57+5:302017-10-28T11:31:24+5:30
धारूर येथील आठवडी बाजार तसेच इतर दिवशीही सीताफळे विक्रीस येत आहेत. मात्र, येथे प्रक्रिया उद्योग नसल्याने ती कवडीमोल दरात विक्री होत आहेत.
- अनिल महाजन
धारूर (बीड) : बालाघाटाच्या डोंगरामध्ये नैसर्गिकरित्या उगवलेल्या झाडांपासून सीताफळाचे उत्पादन मिळते. मागील २० दिवसांपासून सीताफळे बहरात आले आहेत. धारूर येथील आठवडी बाजार तसेच इतर दिवशीही सीताफळे विक्रीस येत आहेत. मात्र, येथे प्रक्रिया उद्योग नसल्याने ती कवडीमोल दरात विक्री होत आहेत.
तालुक्यातील जमीन हलक्या प्रतीची व मुरमाड आहे. या जमिनीत नैसर्गिकरीत्या उगवलेली सीताफळांची खुरटी झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. कसल्याही प्रकारचा रासायनिक खताचा वापर केला जात नसल्याने ही सीताफळे सेंद्रीय प्रकारात मोडतात. चवीला मधुर व रसाळ असल्याने या सीताफळांना राज्याबाहेरही मागणी असते. या वर्षी पावसामुळे सीताफळे चांगली पोसली आहेत.
तालुक्यात ६ हजार ६०० हेक्टर जमीन वनविभागाच्या ताब्यात आहे. बहुतांश जमीन डोंगराळ असल्याने मोठया प्रमाणात सीताफळांची झाडे आहेत . या जमिनीत वनविभागामार्फत दरवर्षी सीताफळांच्या झाडांची लागवड करण्यात येते. वनजमिनीतून मिळणा-या सीताफळांचा दरवर्षी लिलाव करण्यात येतो. यातून ५० ते ६० हजार रुपयांचे उत्पन्न वनविभागाला मिळते.या वर्षी काही खंडानंतर पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. यामुळे सीताफळे चांगली पोसली आहेत. मागील २० दिवसांपासून महिला मजूर, सुटी असल्याने शाळकरी मुले सीताफळांची तोडणी करुन आठवडी बाजारात विक्रीस आणू लागले आहेत.
व्यापारी टोपलीवर भाव ठरवून खरेदी करतात. एका टोपलीतून " १५० ते २०० मिळतात. एक विक्रेता दिवसातून दोन टोपलीच्या जवळपास सीताफळे विक्री करतात. परिसरातील काही व्यापारी सीताफळांची कवडीमोल किंमतीत खरेदी करतात व नंतर इतर बाजारात पाठवितात. सीताफळ तोडणीपासून तीन ते चार दिवसात खाण्यायोग्य होते. नंतर ते खराब होत असल्याने त्याची साठवणूक करता येत नाही. खरेदी केलेली सीताफळे टेम्पोच्या सहाय्याने औरंगाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर तसेच गुजरात राज्यातील सुरत, अहमदाबाद इ. ठिकाणी विक्रीस नेतात. सीताफळाच्या व्यवसायातून दरवर्षी ४० ते ५० लाखांची उलाढाल होते.
राजकीय नेतृत्वाच्या अभावाने प्रश्न रखडला
- साधारणत: पावसाळ्याच्या सुरुवातीला जून-जुलै महिन्यात पानगळ झाल्यास सीताफळांच्या झाडांना कळ्या लागण्यास सुरुवात होते.
- पावसाळ्याच्या कालावधीत चांगला पाऊस झाल्यास सीताफळे लवकर पोसली जातात.
- सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात सीताफळे परिपक्व होतात. सीताफळ कळ्या येण्यापासून तोडणीपर्यंत चार महिन्यांचा कालावधी लागतो.
- धारूर येथे सीताफळावर प्रक्रिया उद्योग व्हावा अशी अनेक दिवसांपासून नागरिकांची मागणी आहे. परंतु प्रभावी राजकीय नेतृत्त्वाअभावी हा प्रश्न कायमस्वरूपी सखडलेला आहे.
- तालुक्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात उसतोड कामगार स्थलांतर करतात. सीताफळ प्रक्रिया उद्योग उभा राहिल्यास हे स्थलांतर थांबू शकेल.
- येथील सीताफळास जी. आय. मानांकन ही मिळालेले आहे. प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीची गरज आहे.