दरोडा टाकण्यापूर्वीच चौघांना बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:43 AM2018-08-20T00:43:30+5:302018-08-20T00:43:59+5:30
दरोडा टाकण्यासाठी निघालेल्या टोळीला परळी ग्रामीण पोलिसांनी सापळा लावत घेरले. ९ पैकी चौघे जेरबंद केले, तर ५ जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले. शनिवारी रात्री अंबाजोगाई - अहमदपूर मार्गावर हा प्रकार घडला. ताब्यातील चौघांकडून जीपसह धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहे. परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
बीड : दरोडा टाकण्यासाठी निघालेल्या टोळीला परळी ग्रामीण पोलिसांनी सापळा लावत घेरले. ९ पैकी चौघे जेरबंद केले, तर ५ जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले. शनिवारी रात्री अंबाजोगाई - अहमदपूर मार्गावर हा प्रकार घडला. ताब्यातील चौघांकडून जीपसह धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहे. परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
गोविंद सौदागर गीते, संभाजी लिंबाजी कांबळे, दत्ता मोहन गीते, शंकर नरसिंह गायकवाड [रा. तळणी, ता. परळी] अशी पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. हे चौघेही एका जीपमधून (एमएच २० बीवाय ५२३५) परळीकडे आले. त्यानंतर ते अंबाजोगाई - अहमदपूर मार्गावरील परळीपासून २० किमी अंतरावरील ढाब्यावर थांबले. काहीजण जीपमध्ये बसलेले होते, तर काही जण बाजूलाच दरोडा टाकण्याचा प्लॅन आखत होते. हा प्रकार अंबाजोगाईचे अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे यांना समजला. त्यांनी तात्काळ परळी ग्रामीण ठाण्याचे पो. नि. सुरेश चाटे यांना माहिती दिली.
प्रकरणाचे गांभीर्य ओळखत चाटे पथकासह रवाना झाले. ढाब्याच्या बाजूने सापळा लावला. खात्री पटताच त्यांनी झडप घातली. परंतु बाहेर उभ्या असलेल्या एका दरोडेखोराचे पोलिसांकडे लक्ष गेले. अंधाराचा फायदा घेत त्यांनी धूम ठोकली. जीपमधील चौघे मात्र पोलिसांच्या हाती लागले. त्यानंतर रात्रभर पोलिसांनी शोध मोहीम राबविली. परंतु इतर पाच जण हाती लागले नाहीत.
दरम्यान, जीपची झडती घेतली असता दोन कु-हाडी, हॉकी स्टिक, सत्तूर, खंजीर, चटणी, दोरी, टांबी, काठ्या असे साहित्य आढळून आले. हे सर्व जप्त करुन परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात चाटे यांच्या फिर्यादीवरुन नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. सुरेश चाटे, पो. उप नि. विकास आडे, विष्णू घुगे, जीवराज हंगे, राजाराम राऊत, सुदर्शन एकुलवार, अमोल मुंडे, व्यंकट सोरमारे, विठ्ठल मदने यांनी केली.