अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:46 AM2021-02-27T04:46:10+5:302021-02-27T04:46:10+5:30
अंबेजोगाई : अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून, तिच्या भावास जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपातून नांदगाव येथील शशिकांत बालासाहेब चव्हाण ...
अंबेजोगाई : अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून, तिच्या भावास जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपातून नांदगाव येथील शशिकांत बालासाहेब चव्हाण यास दोषी ठरवून जन्मठेप व ३१ हजार रुपये दंड, अशी शिक्षा अंबेजोगाई येथील अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश माहेश्वरी पटवारी यांनी शुक्रवारी ठोठावली.
अंबेजोगाई तालुक्यातील नांदगाव येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील शशिकांत बाळासाहेब चव्हाण याने ती एकटी असल्याचे पाहून तिला ओढत शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुठे वाचता केलीस, तर तुला व तुझ्या लहान भावाला जीवे मारेन, अशी धमकी देत, पीडित मुलीवर वारंवार अत्याचार केले. या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात शशिकांत चव्हाण यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होतो.
या प्रकरणाचा पोलीस तपास बर्दापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी केला व आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हे प्रकरण सुनावणीसाठी अंबेजोगाई येथील अपर जिल्हा व सत्र न्यायालयासमोर आले. सरकारी वकील अशोक कुलकर्णी यांनी आरोपीविरुद्धचे सबळ पुरावे सादर केले. या प्रक्रियेत सरकारी पक्षाच्या वतीने सात साक्षीदार तपासण्यात आले. आरोपी विरुद्धचे ठोस पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने शशिकांत बालासाहेब चव्हाण यास दोषी ठरवून, जन्मठेप व ३१ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास कारावासाची शिक्षा, तसेच सदरचा दंड हा पीडित मुलीस देण्यात यावा, असा आदेश दिला. समाजकल्याण विभागाच्या वतीने ही इतर मदत पीडितेस देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने अॅड.अशोक कुलकर्णी यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड.एस.व्ही.मुंडे, अॅड.व्ही.एस.डांगे, अॅड.एन.एस.पुजदेकर, अॅड.पैरवी कदम यांनी सहकार्य केले.