फूस लावून पळवून नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बीडमधून आरोपी-मुलीस घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 04:39 PM2022-06-27T16:39:28+5:302022-06-27T16:41:08+5:30
या प्रकरणी पुढील तपास पिंक मोबाईल पथकाकडे देण्यात आला आहे.
दिंद्रुड (बीड) : एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना 20 जून रोजी माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीत घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी रविवारी रात्री कारवाई करत बीड येथून अल्पवयीन मुलगी आणि आरोपीस ताब्यात घेतले आहे. सचिन तोंडे ( रा. नागझरी ता. केज ) असे आरोपीचे नाव आहे. सदर गुन्ह्यात बलात्कारासह पोस्को गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पिंक मोबाईल पथकाकडे दिला असल्याचे दिंद्रुड पोलिसांनी सांगितले.
सविस्तर वृत्त असे की, दिंद्रुड पोलीस हद्दीतील एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला केज तालुक्यातील नागझरी येथील सचिन तोंडे या युवकाने फूस लावून पळवून नेले होते. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून 21 जून रोजी दिंद्रुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिंद्रुड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर यांनी तात्काळ दखल घेत मोबाईल लोकेशनवरून तपास सुरु केला. दरम्यान, हे युगल बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत असल्याची गोपनीय माहिती रविवारी पोलिसांना मिळाली.
यावरून रविवारी रात्री पोलिसांनी छापा टाकत अल्पवयीन मुलगी आणि आरोपीस ताब्यात घेतले. दरम्यान, पोलीस तपासात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची बाब उघड झाली. त्यामुळे आरोपीच्या विरोधात बलात्कारासह पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास माजलगाव येथील पिंक मोबाईल पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक निशिगंधा खुळे, पोलीस कॉन्स्टेबल माया मस्के करत आहेत.