विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरण; शिक्षकाला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 07:04 PM2019-12-20T19:04:46+5:302019-12-20T19:07:40+5:30
जालना येथे क्रीडा स्पर्धेसाठी नेऊन एका विद्यार्थिनीवर क्रीडा शिक्षक शाम वारकड याने अत्याचार करून वाच्यता न करण्याची धमकी दिली होती.
अंबाजोगाई (जि. बीड) : विद्यार्र्थिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या क्रीडाशिक्षक शाम वारकड याला २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. १ न्या. एस. एस. सापटणेकर यांच्या न्यायालयाने दिले.
जालना येथे क्रीडा स्पर्धेसाठी नेऊन एका विद्यार्थिनीवर क्रीडा शिक्षक शाम वारकड याने अत्याचार करून वाच्यता न करण्याची धमकी दिली होती. अत्याचाराच्या घटनेनंतर सदरील विद्यार्थिनी शाळेत शांत राहू लागली. ती निराश व उदासीन वाटू लागल्याने तिच्या वर्गशिक्षिकेने तिची चौकशी केली. वारंवार केलेल्या चौकशीनंतर पीडित विद्यार्थिनीने अत्याचाराची माहिती शिक्षिकेस सांगितली. शिक्षिकेने या घटनेची माहिती मुख्याध्यापक व शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर मुख्याध्यापक व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार तिच्या पालकांना सांगून गुन्हा दाखल करण्यास सांगितले. अंबाजोगाई पोलिसांनी बुधवारी आरोपी शिक्षकाला अटक केली. गुरुवारी सकाळी अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. १ न्या. एस. एस. सापटणेकर यांच्या न्यायालयासमोर तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांनी हजर केले असता न्यायालयाने त्याला २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
आरोपीने यापूर्वीही दिला होता माफीनामा
शालेय विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या शाम वारकड या क्रीडा शिक्षकाने गुरू-शिष्य नात्याला कलंक लावून आपली विक्षिप्त मनोवृत्ती समाजासमोर आणली आहे. हा क्रीडा शिक्षक यापूर्वीही अशा प्रकरणांमुळे माफी मागून सेवेत होता. शाम याचे वडील पोलिस दलात होते तर त्याचा मोठा भाऊ वरिष्ठअधिकारी आहे. उद्धट वर्तनामुळे इतर शिक्षक त्याच्यापासून दूर राहत असत. लातूर येथे त्याने असाच गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्याच्याकडून माफीनामा लिहून घेण्यात आला होता व त्याची बदली अंबाजोगाईत करण्यात आली होती. शाम याला नाशिक येथील एका संस्थेने राष्ट्रीय आदर्श क्रीडा शिक्षक म्हणूनही सन्मानित केले होते.
निलंबनाचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविला
शालेय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केलेला शिक्षक शाम वारकड याला पोलिसांनी अटक केल्यानंतर संस्थेने गंभीर दखल घेत या शिक्षकाला निलंबित करण्याचा ठराव घेतला व तो ठराव शिक्षणाधिकाऱ्यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.