रॅपिड ॲन्टिजन चाचणीही ग्राह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:32 AM2021-04-18T04:32:59+5:302021-04-18T04:32:59+5:30
हद्दीचे संरक्षण, पण स्वच्छता नाही अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात अनेकांनी गुंतवणूक म्हणून मोठ्या प्रमाणात खुले प्लॉट विकत ...
हद्दीचे संरक्षण, पण स्वच्छता नाही
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात अनेकांनी गुंतवणूक म्हणून मोठ्या प्रमाणात खुले प्लॉट विकत घेऊन ठेवले आहेत. हजारो रुपये खर्च करून या प्लॉटला संरक्षण भिंत व गेट बसविण्यात आले आहेत. आपल्या प्लॉटची हद्दीबाबत पुरेपूर काळजी घेतली आहे; मात्र या प्लॉटमध्ये उगवलेली झुडुपे, गवत त्यामुळे निर्माण होणारी अस्वच्छता याकडे मात्र मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. परिणामी, याचा मोठा त्रास शेजारी राहणाऱ्या कुटुंबीयांना होऊ लागला आहे.
स्वच्छतागृहाच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील सावरकर चौक परिसरात नगर परिषदेच्यावतीने स्वच्छता गृह बांधण्यात आले आहेत. या स्वच्छतागृहाची स्वच्छता सातत्याने होत नाही. परिणामी, रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीचा मोठा सामना करावा लागतो. या स्वच्छतागृहाच्या बाजूलाच चहाच्या टपऱ्या, खाद्यपदार्थांचे गाडे उभे असतात. याचा मोठा परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर होऊ शकतो. यासाठी या स्वच्छतागृहांची स्वच्छता दैनंदिन व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भास्कर चाटे यांनी केली आहे.
स्कूल बसचालकांवर उपासमारीची वेळ
अंबाजोगाई : कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने गेल्या वर्षभरापासून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. अंबाजोगाई शहरातील शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी स्कूल बसची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या स्कूल बसचालकांना गेल्या वर्षभरापासून आपल्या बस घरासमोर लावण्याची वेळ आली आहे. अनेकांनी बँकेकडून कर्ज घेऊन गाड्या घेतल्या. वर्षभरापासून स्कूलबस बंद राहिल्याने बँकेचे भाडे वाढले व उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
अंगणवाडी केंद्रात गर्भवतींना मार्गदर्शन
अंबाजोगाई : वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या काळात स्वत:चे आरोग्य सांभाळून पोषण आहार घेण्याबाबत परिसरातील अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांकडून गर्भवतींना मार्गदर्शन केले जात आहे. त्यांनी घ्यावयाची काळजी व मदतीची आवश्यकता असल्यास कुठे संपर्क करायचा, याबाबत अशा महिलांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
श्रमसंस्कार शिबिराला कोरोनाचा फटका
अंबाजोगाई : राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रम संस्कार शिबिर गावोगावी आयोजित करण्यात येते; परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने व महाविद्यालये बंद राहिल्याने राष्ट्रीय सेवा योजनेची शिबिरे यावर्षी रद्द करण्यात आली आहेत. श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून आजपर्यंत लोकसहभाग व युवकांच्या माध्यमातून मोठी कामे झालेली आहेत.