रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग पाडला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 06:30 PM2017-07-28T18:30:15+5:302017-07-28T18:30:35+5:30
तालखेड ते इरला हा १६ कि.मी. चा रस्ता अत्यंत खराब झालेला असुन या रस्त्याने पायी चालणे देखील अत्यंत कठीण झाले आहे. यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा या मागणीसाठी या रस्त्यावरील गावातील नागरिकांनी एकत्र येत सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान तालखेड फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२२२ वर रस्ता रोको आंदोलन केले.
ऑनलाईन लोकमत
माजलगाव (जि. बीड) दि. २८ : तालखेड ते इरला हा १६ कि.मी. चा रस्ता अत्यंत खराब झालेला असुन या रस्त्याने पायी चालणे देखील अत्यंत कठीण झाले आहे. यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा या मागणीसाठी या रस्त्यावरील गावातील नागरिकांनी एकत्र येत सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान तालखेड फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२२२ वर रस्ता रोको आंदोलन केले. सुमारे दोन तास हे आंदोलन चालल्याने महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजुने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने वाहतुक सुरळीत करतांना पोलीस प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागली.
माजलगांव सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अंतर्गत तालखेड ते इरला मजरा हा रस्ता येतो. हा रस्ता गेवराई मतदार संघातील असल्यामुळे माजलगाव सा.बां. उपविभाग हा रस्ता गेवराई विभागाकडे वर्ग केला असल्याचे सांगतात. तर गेवराई सा.बां. उपविभाग रस्ता आमच्याकडे अजुन वर्ग झाला नसल्याचे सांगतात. यामुळे या रस्त्याबाबत नेमका कोणाला जाब विचारावे या अडचणीत येथील ग्रामस्थ आहेत.
तालखेड परिसर हा माजलगांव तालुक्यात येतो परंतु मतदानासाठी गेवराई मतदार संघात येतो. यामुळे राजकीय पुढा-यांचेही इकडे कमीच लक्ष आहे. रोज या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात शाळकरी मुल आणि मुली जातात. यातच आता या रस्त्यावरून पायी चालणे देखील कठीण झाले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी अखेर येथील ग्रामस्थांनी ' तालखेड सर्कल रस्ता जनआंदोलन कृति समिती स्थापन' करुन थेट महामार्ग रस्तारोको आंदोलनाचा मार्ग स्विकारला.
आंदोलकांची प्रशासनाकडुन बराचकाळ कसल्याही प्रकारची दखल घेतली न गेल्यामुळे आंदोलन लांबत गेले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजुने मोठया प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शेवटी पोलीसांनी हस्तक्षेप केल्यानंतर आंदोलन थांबले आणि तब्बल तीन तासानंतर वाहतुक सुरळीत झाली.
पोलिसांचा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न
आंदोलन खूप वेळ चाल्याने पोलीसांनी हस्तक्षेप करीत आंदोलन थांबवा नाहीतर कारवाईला सामोरे जा अशी तंबी दिली. यावर आंदोलनकर्ते जास्तच भडकले, प्रशासनाकडुन कोणीही आमच्या आंदोलनाची दखल घेण्यास आले नाही अस म्हणत त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. पोलीस व आंदोलक यांच्यात यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होता
आंदोलनकर्त्यांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होण्याची काळजी घेण्याबाबत सांगीतले होते. आम्हाला दहा मिनिटे रस्त्यावर बसुन आंदोलन करु द्यावे त्यांनी सांगितले परंतु दहा मिनिटांनंतरही ते बसून राहिले. यामुळे परिस्थितीचा अंदाज घेवून आम्हाला त्यांना बाजुला हटवावे लागले. - संजय पवार, पोलीस निरीक्षक, ग्रामिण पोलीस ठाणे माजलगांव