'वाहनचालक, अधिकाऱ्यांवर कारवाई करा'; डिगांबर शिराळे मृत्यूप्रकरणी पत्रकार संघाचे रास्तारोको
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 04:11 PM2022-06-16T16:11:29+5:302022-06-16T16:12:52+5:30
खामगाव - पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर चोरांबा फाटा दरम्यान तब्बल बारा किमीचा मार्ग अरुंद आहे.
किल्ले धारूर (बीड ): धारूर येथील पत्रकार दिगांबर शिराळे यांचे खामगाव पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर मागील पंधरा दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते . या प्रकरणात दोषी असणाऱ्या संबंधित वाहनावर व रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तात्काळ नोंद करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज धारूर पत्रकार संघाच्यावतीने चोरांबा फाटा येथे आज दुपारी रस्तारोको आंदोलन करण्यात आले.
खामगाव - पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर चोरांबा फाटा दरम्यान तब्बल बारा किमीचा मार्ग अरुंद आहे. त्यामुळे मागील तीन वर्षात येथे मोठ्या प्रमाणामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, १ जून रोजी धारूर येथील पत्रकार डिगांबर शिराळे यांचे याच अरुंद मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघाती निधन झाले. परंतु, अपघात होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटला तरी शिराळे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला नाही.
धडक दिलेल्या वाहनावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अरुंद रस्त्यामुळे अपघात झाला असून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखलकरून रस्ता रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी धारूर तालुका पत्रकार संघाने निवेदनद्वारे तहसिलदार व पोलीस स्टेशन धारूर यांना केली होती. मात्र, १५ दिवस उलटूनही या प्रकरणी काहीच प्रगती झाली नसल्याने आज दुपारी धारूर पत्रकार संघाच्यावतीने चोरांबा पाटी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात पत्रकारांबरोबर चोरांबा येथील ग्रामस्थांनी सहभाग घेतला. नायब तहसिलदार जी. बी. तापडीया यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले.