तालुक्यात रसवंतीचे घुंगरू वाजू लागले; मात्र कोरोनामुळे ग्राहकांचा गोडवा कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:32 AM2021-04-06T04:32:16+5:302021-04-06T04:32:16+5:30
गेवराई : यावर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच कडक उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणात जाणवू लागले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तालुक्यातील विविध भागांत ...
गेवराई : यावर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच कडक उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणात जाणवू लागले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तालुक्यातील विविध भागांत रसवंतीचे घुंगरू वाजू लागले. मात्र, या रसवंतीला कोरोनाचा फटका जाणवू लागला आहे. रसवंती सुरू झाल्या. मात्र, ग्राहक फिरकत नसल्याचे येथील रसवंती मालक राजू पानखडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मार्च महिन्यात उन्हाळ्याची चाहूल मोठ्या प्रमाणात जाणवू लागली. आता एप्रिल महिना सुरू झाला व उन्हाच्या कडाक्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होताना दिसत आहे. त्याचबरोबर तालुक्यातील ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण हंगामी व्यवसाय म्हणून रसवंतीची निवड करतात व यातूनच आपला उदरनिर्वाह भागवतात. त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील विविध भागांतील रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात रसवंतीची दुकाने सुरू झाली व घुंगराचा आवाज येऊ लागला. मात्र, गेल्या वर्षी कोरोनामुळे अनेक ठिकाणच्या रसवंत्या बंद होत्या, तर याही वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रसवंत्या सुरू झाल्या. मात्र, ग्राहकाचा पत्ताच नसल्याने तीन हजार रुपये टनाने ऊस घेऊनही या उसाचे पैसे निघत नसल्याचे तालुक्यातील राजपिंपरी येथील रसवंती मालक राजू पानखडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
राजपिंपरी रोडवर आम्ही हजारो रुपये खर्च करून पत्र्याचे शेड, तसेच उसाचा रस काढण्यासाठी मशीन आणली व रसवंती सुरू केली, तसेच तीन हजार रुपये टनाने ऊस विकत घेतला. मात्र, कोरोनामुळे ग्राहक येत नसल्याने उसाचे पैसेदेखील निघत नसल्याचे पानखडे यांनी सांगितले.