जायकवाडीतून पुन्हा विसर्ग; गोदावरीच्या पुराने पांचाळेश्वर, राक्षसभुवन येथील मंदिरे पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 07:13 PM2022-08-10T19:13:17+5:302022-08-10T19:13:33+5:30
पैठण येथील नाथसागर जलाशयातून २९८८५ क्युसेस पाणी गोदावरी पात्रात सोडले जात आहे
- सखाराम शिंदे
गेवराई (बीड) - पैठण येथील नाथसागर जलाशयातून मंगळवारी रात्री धरणाचे १० ते २७ क्रमांकाचे १८ दरवाजे दिडफुटाने उचलून २९८८५ क्युसेस विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात आला. यामुळे गोदावरीची पाणीपातळी वाढली असून महिनाभरात दुसऱ्यांदा आत्मतिर्थ पांचाळेश्वर येथील दत्त मंदिर व राक्षसभुवन येथील शनी मंदिर बुडाले आहेत.
पैठण येथील नाथसागर जलाशयात नाशिकवरून मोठी आवक येत आहे. त्यामुळे धरणातून मंगळवारी रात्री १० ते २७ क्रमांकाचे असे एकूण १८ दरवाजे दिड फुटाने उचलून २९८८५ क्युसेस पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील तिर्थक्षेत्र असलेले पांचाळेश्वर येथील आत्मतिर्थ मंदिर अर्धे पाण्यात बुडाले आहे. तसेच तिर्थक्षेत्र राक्षसभुवन येथील शनी महाराजांची मुर्तीही पाण्यात बुडाली आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणचे दर्शन बंद असल्याची माहिती महंत विजयराज गुर्जर बाबा व शनी ट्रस्टचे सचिव सुरेंद्र पाठक यांनी दिली आहे.