२०१९ च्या लढाईसाठी सरसेनापतीची पुन्हा जुळवाजुळव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:42 AM2018-12-02T00:42:33+5:302018-12-02T00:43:28+5:30

आगामी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामचे संस्थापक, ‘सरसेनापती’ आ. विनायक मेटे यांनी दोन पावले मागे येत पुन्हा एकदा विस्कटलेली घडी सुधारण्यासाठी मावळ्यांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे.

Re-match with the Chief of the Army for the Battle of 2019 | २०१९ च्या लढाईसाठी सरसेनापतीची पुन्हा जुळवाजुळव

२०१९ च्या लढाईसाठी सरसेनापतीची पुन्हा जुळवाजुळव

Next

सतीश जोशी । लोकमत न्यूज नेटवर्क
आगामी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामचे संस्थापक, ‘सरसेनापती’ आ. विनायक मेटे यांनी दोन पावले मागे येत पुन्हा एकदा विस्कटलेली घडी सुधारण्यासाठी मावळ्यांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी झालेल्या ताणाताणीनंतर मध्यंतरी विनायक मेटे एकाकी पडले होते, त्यांना बीड जिल्ह्यातच एकाकी पाडण्याचा प्रयत्न मित्रपक्ष असलेल्या भाजपाने केला होता. बेलगावच्या रस्ता विकासकामांच्या भूमीपूजन कार्यक्रमात मेटेंचे खंदे समर्थक तथा शिवसंग्रामच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना सरसेनापतीविरुद्धच बंडखोरी करण्यास प्रवृत्त केले होते. मस्के यांच्या जि.प. सर्कलमधील कामांसाठी पालकमंत्री पंकजा यांनी जवळपास १४ कोटी रुपयांचा भरीव निधी दिला होता. पालकमंत्र्याच्या मर्जीशिवाय जिल्ह्यातील विकासकामांसाठी दमडीही मिळत नाही, हे मस्के यांनीही ओळखून ही बंडखोरीची उडी मारली. शिवाय विधानसभा २०१९ साठी भाजपाकडून बीड उमेदवारीचे ‘आश्वासन’ मिळाले होते. यानंतर पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यातील राजकीय वाद आणखी भडकला. दुष्काळ आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १२ नोव्हेंबर रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर एक-दीड महिना अलिप्त राहिलेले मेटे हे पुन्हा सक्रिय झाले. आढावा बैठकीसाठी मेटे हे मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून गेले. विशेष म्हणजे या गाडीत त्यांच्यासोबत पालकमंत्री पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे आणि आ.विनायक मेटे हे तिघेही मागच्या सिटवर बसले होते. भाजपा आणि शिवसंग्राममध्ये वाद नसून सर्वकाही आलबेल आहे, असा संदेश यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याला दिला असावा.
मुख्यमंत्र्यांच्या या बीड बैठकीनंतर विनायक मेटे अधिक सक्रिय झाले. ग्रामीण भागातील संपर्क दौरे, बैठका वाढविल्या. शिवसंग्रामच्या विचारांच्या तरुणांना एकत्र आणून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी जुळवाजुळव सुरू केली. गणेश बजगुडे यांच्या शिवक्रांती संघटनेचे थाटामाटात शिवसंग्राममध्ये विलिनीकरण केले. शिवक्रांतीच्या मावळ्यामुळे शिवसंग्रामची युवाशक्ती वाढली. जिल्ह्यातील शिवसेनेचे सरदार राम मंदिरासाठी अयोध्यात असताना शिवसेनेला सुरुंग लावताना नाराज शिवसैनिक सुदर्शन धांडे, नारायण काशीद, नवनाथ प्रभाळे, कल्याण जाणवळे यांच्यासह अनेकांना शिवसंग्राममध्ये प्रवेश देऊन ताकद वाढविली. काकू-नाना आघाडीचे मधुकर डोईफोडे, कृष्णा डोईफोडे, भीमा खाडे, लक्ष्मण डोईफोडे यांनाही शिवसंग्राममध्ये प्रवेश दिला. कार्यकर्ता छोटा की मोठा हे न बघता मेटेंची ही जमवाजमव त्यांच्या सक्रियतेची पावती आहे. झालेल्या चुका सुधारण्याचा त्यांचा हा प्रयत्न भविष्यात त्यांना निश्चितच लाभदायक ठरणारा आहे. पंकजा मुंडे आणि विनायक मेटे या दोघांनाही एकमेकातील वाद परवडणारे नाहीत. आगामी लोकसभेच्या तोंडावर शिवसंग्रामची नाराजी भाजपाला महागाची पडू शकते तसेच विधानसभेच्या बीड मतदार संघात विनायक मेटेंना भाजपाची, मुंडे भगिनीची गरज पडणार आहे. त्यासाठी मेटेंना लोकसभा निवडणुकीत मुंडे भगिनीच्या मागे शिवसंग्रामची ताकद लावावी लागेल.

Web Title: Re-match with the Chief of the Army for the Battle of 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.