पुस्तक वाचनामुळे विवेक, मन, बुद्धीला चालना मिळते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:35 AM2021-04-28T04:35:40+5:302021-04-28T04:35:40+5:30
बीड : पुस्तक माणसाला अंतर्मुख व्हायला भाग पाडते, पुस्तक मनाची आणि बुद्धीची भूक वाढविते. पुस्तकांनी घर सजवावे. ...
बीड : पुस्तक माणसाला अंतर्मुख व्हायला भाग पाडते, पुस्तक मनाची आणि बुद्धीची भूक वाढविते. पुस्तकांनी घर सजवावे. घरामध्ये मौलिक ग्रंथ असायला हवेत, घराची शोभा किती दर्जेदार पुस्तके आहेत, यावरून वाढत असते. ज्या वाचनाने बुद्धीला चालना मिळते, ज्ञानात भर पडत आणि माणसाच्या मनाला प्रेरणा मिळते, ते खरे वाचन होय, असे प्रतिपादन निवृत्त प्राचार्य तथा ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ लातूर येथील डॉ.सोमनाथ रोडे यांनी केले.
येथील महिला कला महाविद्यालयात २३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिनानिमित्त अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि ग्रंथालय विभागाद्वारा राज्यस्तरीय वेबिनारचे ‘निमित्त जागतिक पुस्तक दिनाचे, जाणू या महत्त्व ग्रंथ वाचनाचे’ या विषयावर आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सविता शेटे यांची उपस्थिती होती. महाविद्यालयाच्या विविध उपक्रम व सुविधांची माहिती सहा.प्रा.डॉ.संध्या आयस्कर यांनी दिली, तर सायली राख हिने पाहुण्यांचा परिचय दिला.
पुढे बोलताना डॉ.सोमनाथ रोडे म्हणाले, ग्रंथ हे सत्याचा गौरव करणारे माध्यम आहे. टीव्ही, मोबाइल, वर्तमानपत्र कोणीही ग्रंथाची जागा घेऊ शकत नाही. पुस्तक माणसाचे मस्तक उन्नत करणारे प्रभावी साधन आहे. पुस्तक वाचणाऱ्या माणसाचा स्वाभिमान जागवतो. पुस्तक खऱ्या अर्थाने माणसाला मन:शांती देण्याचे काम करतो. आज मात्र युवापिढीमध्ये ग्रंथवाचनाची आवड कमी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन सहा.प्रा.डॉ.संध्या आयस्कर यांनी केले, तर अभार ग्रंथपाल ज्योती मगर यांनी मानले. कार्यक्रमासाठी सहा.प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विविध संस्था, संघटनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते, गृहिणी, विद्यार्थी, विद्यार्थिनींची उपस्थिती होती.
विचार-आचार समृद्ध करणारे वाचन केले पाहिजे
वेबिनारचा अध्यक्षीय समारोपप्रसंगी मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ.सविता शेटे म्हणल्या, सर्वांगीण व्यक्तिमत्त्वासाठी चांगले वाचन करणे गरजेचे आहे. लेखन आणि वाचन व्यक्तीला जगायला शिकवते. विचार विवेकी आणि समृद्ध होण्यासाठी वाचन केले पाहिजे. प्रत्येकाच्या घरामध्ये पुस्तकाचा एक कोपरा असला पाहिजे. वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते.