शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
By आनंद मोहरीर | Published: October 28, 2024 06:25 PM2024-10-28T18:25:47+5:302024-10-28T18:27:51+5:30
शरद पवार गटातील नेत्याने प्रचंड शक्तीप्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
परळी: महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे यंदाची निवडणूक खूप खास बनली आहे. अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, असा सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे, या पक्षफुटीमुळे यंदा बंडखोरांची संख्याही वाढली आहे. पक्षाकडून उमेदवारी न मिळालेल्या अनेक इच्छुकांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यामध्ये परळी विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत बंडखोरी पाहायला मिळत आहे.
धनंजय मुंडे पवारांच्या टार्गेवर
धनंजय मुंडेंनी भाजप सोडल्यानंतर शरद पवारांनीच त्यांना आपल्या पक्षात घेऊन विधान परिषदेवर पाठवले होते. पण, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मुंडे अजित पवार गटात सामील झाले आणि अनेकवेळा शरद पवार गटावर जहरी टीकाही केली आहे. यामुळे मुंडे सध्या शरद पवारांच्या टार्गेटवर आहेत. धनंजय मुंडेंचा पराभव करण्यासाठी शरद पवारांनी परळीत मराठा कार्ड खेळले आहे. पवारांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेल्या राजेसाहेब देशमुख यांना आपल्या पक्षात घेऊन परळीतून उमेदवारी दिली. पण, आता यामुळेच पक्षात बंडखोरी झाली आहे.
राजेभाऊ फड अपक्ष निवडणूक लढवणार
काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय समाज पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस(शप) मध्ये सामील झालेले राजेभाऊ फड परळीतून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून याची तयारीदेखील केली होती. धनंजय मुंडेंचा आपणच पराभव करणार, असा निर्धार राजेभाऊ फड यांनी केला होता. पण, शरद पवारांनी त्यांना डावलून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे राजेभाऊ फड नाराज झाले आणि त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली. तसेच, त्यांनी आज आपला उमेदवारी अर्जही दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी पक्षाला अल्टीमेटम दिला आहे. उद्यापर्यंत परळीचा उमेदवार बदला, अन्यथा मी अपक्ष निवडणूक लढणार, अशी घोषणा त्यांनी आज केली.
पवारांचे मराठा कार्ड
परळी मतदारसंघात मराठा आणि वंजारी समाजाचे निर्णायक मतदान आहे. शिवाय, मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाला परळीतूनही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला होता. विशेष म्हणजे, याच जरांगे फॅक्टरमुळे लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला अन् मराठा समाजाचे बजरंग बप्पा सोनवणे विजयी झाले. असाच पाठिंबा विधानसभा निवडणुकीत मिळेल, या ही अपक्षा ठेवून शरद पवार गटाने परळीत मराठा उमेदवार दिला आहे. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांच्या 'मनसे'देखील मराठा समाजातील अभिजीत देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.