माजलगावात दोन्ही राष्ट्रवादीचे बंडखोर निर्मळ-आडसकर रिंगणात, सोळंके-जगतापांना टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 07:46 PM2024-11-04T19:46:42+5:302024-11-04T19:49:01+5:30
माजलगाव मतदारसंघात ९८ जणांपैकी ६४ जणांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतले.
माजलगाव: माजलगाव विधानसभा मतदारसंघ निवडणूकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ९८ जणांपैकी ६४ उमेदवारांनी सोमवारी शेवटच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामुळे आता महायुतीचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके, महाविकास आघाडीचे मोहन जगताप, अपक्ष रमेश आडसकर, अपक्ष माधव निर्मळ या प्रमुख उमेदवारांसह ३४ जण निवडणुक रिंगणात आहेत.
माजलगाव विधानसभा मतदारसंघ निवडणूकीत प्रमूख पक्षांच्या उमेदवारांसह एकूण ९८ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक, अॅड. नारायण गोले, गंगाबिषण थावरे, नितीन नाईकनवरे, उद्धव नाईकनवरे आदि प्रमुखांसह ६४ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता अजित पवार राष्ट्रवादी, भाजप, शिंदे शिवसेना महायुतीकडून विद्यमान आमदार प्रकाश सोळंके, शरद पवार राष्ट्रवादी, शिवसेना, कॉँग्रेस महाविकास आघाडीचे मोहन जगताप, अपक्ष रमेश आडसकर,अपक्ष माधव निर्मळ या प्रमुख उमेदवारासह ६४ उमेदवारांत चुरसीची लढत होईल.
दोन्ही राष्ट्रवादीचे बंडखोर रिंगणात
अजित पवार राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांना उमेदवारी दिल्याने जिल्हा कोषाध्यक्ष माधव निर्मळ नाराजगी व्यक्त करत पक्षापासून वेगळे झाले. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे भाजपमधून शरद पवार राष्ट्रवादीत गेलेले रमेश आडसकर यांना मोहन जगताप यांची उमेदवारी जाहीर झाल्याने धक्का बसला. त्यामुळे त्यांनी देखील उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केली. आता मतदारसंघात महायुतीचे सोळंके, महाविकास आघाडीचे जगताप आणि दोन्ही राष्ट्रवादीचे बंडखोर निर्मळ, आडसकर यांच्यात थेट लढत होण्याची चिन्हे आहेत.