पावत्या दुसऱ्या जिल्ह्यातील, वाळू साठवणूक बीड परिसरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 02:13 PM2019-08-06T14:13:15+5:302019-08-06T14:13:50+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीसाठी नेमली द्विसदस्यीय समिती
- प्रभात बुडूख
बीड : जिल्ह्यातील वाळू घाटांवरुन कोल्हापूर, कागल, सातारा, कराड, पुणे या शहराच्या पावत्या घेऊन वाळू वाहतूक केली जात असल्याचे भासवून, ती वाळू बीड शहर व परिसरात विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी द्विसदस्यीय समिती स्थापन केली आहे. याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी १५ दिवसांत मागवला आहे.
गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथील वाळू साठ्यावरुन कोल्हापूर येथे ३ ब्रास वाळू घेऊन जात असल्याची पावती हायवा चालकाने घेतली होती. मात्र, ती वाळू बीड शहरालगतच्या तळेगाव येथील बांधकामाच्या ठिकाणी टाकली. ही वाळू उतरविताना उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत व सोबतच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली होती.
याप्रकरणी चालक शेख अय्युब अजीज व हायवा मालक संदीपान बडगे यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता. याचा तपास करताना शासनाचा महसूल बुडवून इतर लांब अंतराच्या शहराचे इन्व्हाईस घेऊन त्या वेळेत वाळू ठेकेदाराच्या संमतीने एकापेक्षा अधिक वेळा वाळूची वाहतूक केली जात असल्याचे सावंत यांच्या निदर्शनास आले होते. तसेच या सर्व प्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला होता. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करुन अहवाल सादर करण्यासाठी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव व गेवराई तहसीलदार संगीता चव्हाण यांची द्विसदस्यीय समिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. तर गंगावाडी ठेका स्थगित होणार द्विसदस्यीय समितीच्या चौकशीत या सर्व बाबी स्पष्टपणे निदर्शनास आल्या तर गेवराई तालुक्यातील गंगावाडी वाळू ठेका स्थगित ठेवण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे. एकाच पावतीवर दुरचे अंतर असलेले शहर दाखवून बीड व परिसरात वाळू टाकणाऱ्या हायवा प्रकरणी पोलीस प्रशासनाने दिलेल्या पत्रानुसार चौकशी करुन १५ दिवसांत अहवाल देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच वेळेत अहवाल दिला नाही तर समितीमधील संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असे आदेशात नमूद केले आहे.
एकाच पावतीवर चार वेळा वाहतूक
गेवराईवरुन बीड शहरात येण्यासाठी नवीन महामार्ग झाल्यानंतर पाडळशिंगी टोलनाका सुरु झाला आहे. त्यावरुन किती वेळा वाळूचा हायवा आला याची तपासणी पोलिसांनी केली आहे. त्यावेळी त्यांना असे दिसून आले की एकाच पावतीवर एकाच हायवाने ४ वेळा वाळूची वाहतूक केली. ते सर्व फुटेज पोलिसांनी हस्तगत केले आहे.