१८ ते ४४ साठी १२५०० तर ४५ वर्षांवरील वयोगटासाठी ४४ हजार डोस प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:55 AM2021-05-05T04:55:22+5:302021-05-05T04:55:22+5:30
बीड : मागील आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना लसीचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. आता मंगळवारी काहीसा दिलासा मिळाला आहे. १८ ते ...
बीड : मागील आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना लसीचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. आता मंगळवारी काहीसा दिलासा मिळाला आहे. १८ ते ४४ साठी १२५०० तर ४५ वर्षांवरील वयोगटासाठी ४४ हजार डोस प्राप्त झाले आहेत. आता प्राथमिक आरोग्य केंद्राला ६०० तर ग्रामीण व उपजिल्हा रूग्णालयाला हजार डोस वाटप केले जाणार आहेत. १८ ते ४४ साठी आणखी पाच केंद्र वाढविण्यात आले आहेत.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच तुलनेत मृत्यूही होताना दिसत आहेत. हे सर्व रोखण्यासाठी सध्या तरी कोरोना लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. जिल्ह्यात आतापर्यंत लसीचे दोन्ही डोस घेऊन पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी एकाचाही मृत्यू झालेला नसल्याने लोकांचा लसीवरचा विश्वास वाढला आहे. त्यामुळे सध्या सर्वच लोक लस घेण्यासाठी केंद्रावर गर्दी करताना दिसत आहेत. असे असले तरी मागील आठवड्यापासून कोरोना लसीचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. केंद्रावरून लोकांना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळाले परंतु आता मंगळवारी लस आल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी अद्यापही मुबलक लस प्राप्त झालेली नाही.
१८ ते ४४ वयोगटासाठी पाच केंद्र वाढविले
१ मे पासून १८ ते ४४ वयाेगटातील लोकांनाही लसीकरण सुरू झाले आहे. यासाठी बीड, अंबाजोगाई, आष्टी, परळी आणि गेवराई असे पाच केंद्र होते. आता आणखी धारूर, वडवणी, शिरूर, पाटोदा आणि माजलगाव येथे लसीकरण केंद्र वाढविण्यात आले आहे. नव्याने आलेले डोस हे याच पाच केंद्रात दिले जाणार आहेत.
...
१८ ते ४४ साठी १२५०० तर ४५ वर्षांवरील वयोगटासाठी ४४ हजार डोस प्राप्त झाले आहेत. पीएचसीला ६०० तर ग्रामीण व उपजिल्हा रूग्णालयाला ८०० ते १००० डोस दिले जाणार आहेत. याबाबत संबंधित सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
-डॉ.संजय कदम, नोडल ऑफिसर, बीड.