जिल्हा रूग्णालयात रुग्णांकडून पैसे घेतले; सफाईगार महिला निलंबित
By सोमनाथ खताळ | Published: July 18, 2023 10:52 PM2023-07-18T22:52:34+5:302023-07-18T22:54:09+5:30
ही कारवाई डॉ. सुरेश साबळे यांनी मंगळवारी रात्री उशिरा केली.
सोमनाथ खताळ, बीड : जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागातील सफाई करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांकडून पैसे घेतले. याचा एक कथित व्हिडीओ व्हायरल झाला होता. याची चौकशी केल्यानंतर यातील एक महिला गंभीर दाेषी आढळल्याने तिला निलंबीत केले. तर दुसरीची वडवणी तालुक्यातील चिंचवण ग्रामीण रूग्णालयात तडकाफडकी बदलीत केली. ही कारवाई डॉ. सुरेश साबळे यांनी मंगळवारी रात्री उशिरा केली.
जोहराबी शेख कासीद असे निलंबित केलेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर कौशल्य विठ्ठलराव काळे यांची बदली करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात प्रसुती झाल्यानंतर रूग्ण व नातेवाईकांकडून पैसे घेण्याची जणू प्रथाच झाली आहे. या विभागातील महिला कर्मचारी रुग्णांसह नातेवाइकांकडून पैसे घेत असल्याचा एक कथित व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर डॉ. साबळे यांनी एका पथकामार्फत चौकशी केली. या पथकाने अहवाल देताच गुरुवारी रात्री उशिरा एका महिला कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली तर दुसरीची बदली केली. यामुळे असे पैसे घेणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, जोहराबी यांना पाटोदा मुख्यालय देण्यात आले आहे.