राज्यात लपविलेल्या ८ हजार कोरोना बळींची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:38 AM2021-07-14T04:38:35+5:302021-07-14T04:38:35+5:30

सोमनाथ खताळ बीड : महाराष्ट्रात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यू चिंतेचा विषय बनला आहे. असे असतानाही आरोग्य विभागाने तब्बल ...

Record of 8000 corona victims hidden in the state | राज्यात लपविलेल्या ८ हजार कोरोना बळींची नोंद

राज्यात लपविलेल्या ८ हजार कोरोना बळींची नोंद

Next

सोमनाथ खताळ

बीड : महाराष्ट्रात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यू चिंतेचा विषय बनला आहे. असे असतानाही आरोग्य विभागाने तब्बल ८ हजार कोरोनाबळी लपविल्याचे उघड झाले आहे. १० एप्रिल २१ रोजी 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करून कारभार चव्हाट्यावर आणताच राज्याची यंत्रणा जागी झाली आणि हे सर्व मृत्यू पोर्टलवर अपडेट केले आहेत. राज्याचा मृत्यू दर कमी करण्यासाठीच हा सर्व खटाटोप केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

देशातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना महाराष्ट्रात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात अपयश आले. उपचारातील हलगर्जी व असुविधांमुळे अनेकांचा कोरोनाने मृत्यू झाला आणि अंत्यविधीसाठी स्मशानात रांगा लागल्या होत्या. खाटा अपुऱ्या पडल्या. औषधांचा तुटवडा, सुविधांबाबत तक्रारींचा ढिगारा लागला होता. कोरोनाला रोखण्यात काही प्रमाणात यश आले असले तरी, मृत्यू रोखण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरल्याचे दिसत आहे. हेच झाकण्यासाठी त्यांनी कोरोनामुळे झालेले मृत्यू आयसीएमआरच्या पोर्टलवर अपडेट केले नसल्याचे सांगण्यात येत आहे. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यावर आरोग्य विभागाने हे सर्व मृत्यू पोर्टलवर अपडेट केले आहेत. आजही दररोज ५० पेक्षा जास्त जुने मृत्यू अपडेट होत असल्याचे दिसते.

'लोकमत'ने असा केला पर्दाफाश...

बीड जिल्ह्यात बीड व अंबाजोगाईतील स्मशानात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जातात. एप्रिल महिन्यात या दोन ठिकाणी ३७८ मृत्यूची नोंद होती. परंतु, आरोग्य विभागाकडे केवळ २७३ मृत्यूची नोंद होती. यात १०५ मृत्यूची तफावत आढळली होती. याबाबत 'लोकमत'ने 'बीडमध्ये आरोग्य विभागाने लपविले १०५ कोरोनाबळी' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून प्रकार चव्हाट्यावर आणला होता. त्यानंतर आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, संचालक आणि नंतर खुद्द आरोग्यमंत्र्यांनी मृत्यू अपडेट करण्याचे आदेश दिले होते.

आयुक्तांकडून बोलण्यास नकार

याबाबत आरोग्य विभागाचे आयुक्त एन. रामास्वामी यांना संपर्क केला. त्यांना कोरोना बळींबाबत विचारणा करताच, यावर आपल्याला चर्चा करायला वेळ नाही, मी महत्त्वाच्या बैठकीला जात असल्याचे सांगून त्यांनी फोन कट केला. संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी फोन घेतला नाही, तर दुसऱ्या संचालिका डॉ. साधना तायडे यांनी कोरोनाशी आपला काही संबंध नसून डॉ. पाटील यांना विचारा असे सांगितले.

बीडमध्ये १२९९ मृत्यूची नोंद

बीडमध्ये आतापर्यंत २ हजार ५५८ मृत्यूची नाेंद झाली असून पैकी १२९९ मृत्यू जुने अपडेट झाले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यांनी सर्वच आरोग्य संस्थांना पत्र काढून मृत्यू अपडेट केल्याचे प्रमाणपत्र घेतले आहे.

बीडमधील मृत्यू अपडेट करण्याबाबत सर्वच आरोग्य संस्थांना पत्र दिले होते. अपडेट केल्याचे प्रमाणपत्रही त्यांनी दिले आहे. यात मृत्यू लपविलेले नसून केवळ पोर्टलवर अपडेट करायचे राहिले होते. या सर्वांचे ऑडिटही झालेले आहे.

- डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

--

जुने मृत्यू अपडेट आकडेवारी

मे - ५३९४

जून - २३७८

११ जुलैपर्यंत - ४०३

एकूण - ८१७५

Web Title: Record of 8000 corona victims hidden in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.