परळी थर्मलमध्ये क्षमतेएवढ्या वीजनिर्मितीचा विक्रम; भर उन्हाळ्यात तीनही संच सुरळीत चालू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2023 02:08 PM2023-04-27T14:08:49+5:302023-04-27T14:09:35+5:30
तीनही संच सुरळीत चालू झाले आहेत. या संचातून ७५० मेगावॅट एवढी वीजनिर्मिती चालू आहे.
परळी (जि. बीड) : मराठवाड्यातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्र असलेल्या नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील भर उन्हाळ्यात तीनही संच सुरळीत चालू असून या तीन संचांतून स्थापित क्षमतेएवढी वीजनिर्मिती बुधवारी दुपारी पाचच्या सुमारास झाली. एकूण ७५० मेगावॅट क्षमतेच्या तिन्ही संचांतून ७५० मेगावॅट एवढ्या विजेचे उत्पादन बुधवारी चालू होते तर मंगळवारी तीन संचांतून ७५५ मेगावॅट म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त वीजनिर्मिती झाली.
परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता प्रफुल भदाने यांनी पाच महिन्यांपूर्वी येथील सूत्रे स्वीकारली. स्वतः विद्युत केंद्रात आठ तासांपेक्षा जास्त वेळ देऊन विद्युत केंद्राचा चेहरा मोहरा बदलून टाकला. सर्व विभागप्रमुख ,अभियंता ,केमिस्ट तंत्रज्ञ व कंत्राटी कामगारांना सोबत घेऊन वीजनिर्मिती वाढविण्यावर भर दिला आणि या सर्वांच्या प्रयत्नांना यश आले. तीनही संच सुरळीत चालू झाले आहेत. या संचातून ७५० मेगावॅट एवढी वीजनिर्मिती चालू आहे.
नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रात २५० मेगावॅट क्षमतेचे अनुक्रमे संच क्रमांक ६,७ व ८ हे तीन संच आहेत. या तीन संचांतून एकूण ७५० मेगावॅट एवढी वीजनिर्मिती होत आहे. मार्चमध्ये ६३० मेगावॅट वीजनिर्मिती होत होती. संच क्रमांक ८ मध्ये कंडेशनर व्हॅक्युमचा अडथळा होता तो मुख्य अभियंता भदाने यांच्या मार्गदर्शनाखाली दूर झाला आहे. जलप्रक्रिया विभागाचा पदभार दिनेश कदम यांच्याकडे सोपविला. सर्व टीमने तेथील समस्या दूर करून संच क्रमांक ८ मधील वीजनिर्मिती वाढविण्यावर भर दिला. या संचातून १५० मेगावॅटच्या पुढे वीज निर्मिती होत नव्हती, तसेच हा संच अधनूमधून बंद पडत होता. आता हा संच सुरळीत चालू असून २५० मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे.
सर्वांच्या प्रयत्नांतून वीजनिर्मिती वाढली
जास्तीत जास्त कोल मिल उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ऑपरेशन व मेंटेनन्स विभागात बदल घडून आणला, परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाने, विद्युत केंद्राचे सर्व विभागप्रमुख, केमिस्ट, अभियंता, कंत्राटी कामगार हे झपाटून काम करत असल्याने परळी विद्युत केंद्राने क्षमतेएवढी वीज निर्मिती करून एक विक्रम केला आहे.
- अंकुश जाधव, केंद्रीय उपाध्यक्ष, इंटक फेडरेशन, परळी.