गौण खनिज महसुलाची उद्दिष्टापेक्षा जास्त वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:32 AM2021-04-06T04:32:49+5:302021-04-06T04:32:49+5:30
बीड : मार्च महिना अखेर जिल्हा गौण खनिज विभागाच्या वतीने ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त टक्के महसूल शासनाच्या तिजोरीत जमा ...
बीड : मार्च महिना अखेर जिल्हा गौण खनिज विभागाच्या वतीने ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त टक्के महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे. मराठवाड्यात यावर्षी सर्वात जास्त महसूल जमा करणाऱ्या यादीत बीडचा तिसरा क्रमांक आहे. याबद्दल विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बीड जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांचे अभिनंदन केले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या गौण खनिज विभागास २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात ९७ कोटी ५० लाख महसूल भरण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्याबदल्यात बीड जिल्ह्याने ९८ कोटी १० लाख रुपये महसूल भरून शासनाच्या तिजोरीत भर टाकली आहे. बीड जिल्हा औरंगाबाद विभागात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात बीड, अंबाजोगाई, केज, परळी, माजलगाव, गेवराई, धारूर, शिरूर कासार, पाटोदा, आष्टी, वडवणी या तालुक्यांमध्ये सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी वाळू, मुरुम, उत्खनन करण्यात आले. त्यामधून मोठ्या प्रमाणात महसूल जमा झाला. तसेच गेवराई व माजलगाव तालुक्यातील नदी पात्रातील ६ वाळू घाटांच्या लिलावातून १६ कोटी महसूल गोळा झाला आहे.
मागील वर्षी वाळू घाटांचे लिलाव झालेले नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा व वाहतूक करण्यात येत होती. त्यावर महसूल व पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाई करून त्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाया करून महसूल जमा करण्यात आला आहे. मात्र, तरी देखील महसूल व पोलीस प्रशासनातील अर्थपूर्ण व्यवहारामुळे अवैध वाळू उपसा जोरात सुरु होता. घाटांचे लिलाव होऊन देखील तीच परिस्थिती आज जैसे थे आहे. महसूल गोळा करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अपर जिल्हाधिकारी मंजूषा मीसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गौण खनिज विभागातील कर्मचारी नायब तहसीलदार तुळशिराम अर्सुळ, अव्वल कारकून हर्षद कांबळे, लिपिक नितीन जोगदंड, संदीप खुरूड यांनी काम पाहिले.
जमिनी महसूल वसुली १२.७६ कोटी
जिल्हा प्रशासनास जमीन महसूल उद्दिष्ट १६.६७ कोटी रुपये इतके होते. वर्षभरात १२.७६ कोटी रुपये वसूल करण्यात आला असून, त्याची टक्केवारी ७६.५७ इतकी आहे.
प्रतिक्रिया
जिल्ह्यातील अवैधरीत्या वाळू उत्खननावर केलेल्या कारवाया व ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात आलेल्या वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियामुळे उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात यश आले आहे.
मंजूषा मिसकर, अपर जिल्हाधिकारी अंबाजोगाई
विभाग उद्दिष्ट वसुली
गौणखनिज ९७.५० कोटी ९८.१० कोटी
जमीन १६.६७ कोटी १२.७६ कोटी