मनोरंजनातून कमी झाला कोविड रुग्णांचा ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:35 AM2021-05-08T04:35:30+5:302021-05-08T04:35:30+5:30
गेवराई : कोरोनाबाधित रुग्णांचा ताणतणाव कमी व्हावा यासाठी शारदा कोविड केअर सेंटर, गढी आणि कस्तुरबा गांधी कोविड केअर ...
गेवराई : कोरोनाबाधित रुग्णांचा ताणतणाव कमी व्हावा यासाठी शारदा कोविड केअर सेंटर, गढी आणि कस्तुरबा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांच्या मनोरंजनासाठी प्रा. सुनील मुंडे निर्मित ‘स्वरसंध्या संगीत रजनी’चे मोफत आयोजन केले होते. बुधवारी (दि. ५) गायक प्रा. सुनील मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरेल गीते सादर करून कोविड रुग्णांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना दयानंद कापसे, योगशिक्षक सिद्धार्थ मुनेश्वर यांचे सहकार्य लाभले.
तालुक्यातील या कोविड केअर सेंटरवर तहसीलदार सचिन खाडे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजय कदम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. महादेव चिंचोले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. सुनील मुंडे यांनी कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसमोर भक्तिगीते, भावगीते, हिंदी, मराठी चित्रपटांतील विविध गीतांसह देशभक्तिपर गीते सादर केली. रुग्णांनीदेखील विविध गाण्यांवर ठेका धरत टाळ्यांच्या गजरात या उपक्रमाला दाद दिली. कोविड सेंटरमध्ये घरातील माणसंही जवळ येऊ शकत नाहीत, या काळात प्रा. मुंडे यांनी आम्हाला आनंद दिला, अशा भावना रुग्णांनी व्यक्त केल्या. प्रा. मुंडे यांनी गेवराई येथील कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी सदाबहारदार गीतांचा कार्यक्रम सादर केल्याचे प्रा. व्ही. यू. राठोड म्हणाले. यावेळी रुग्णांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून कार्यक्रमाचा उद्देश सार्थ झाल्याची भावना प्रा. सुनील मुंडे यांनी व्यक्त केली.
गेवराई येथील कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी गीतांचा कार्यक्रम सादर करण्याची इच्छा प्रा. मुंडे यांनी व्यक्त केली होती. सकारात्मक प्रतिसाद देत त्यांना परवानगी देण्यात आली होती. त्यांनी सदाबहार गीते सादर करून रुग्णांचे मनोरंजन केले.
- डाॅ. संजय कदम, तालुका आरोग्याधिकारी
प्रशासन, डॉक्टर, नर्सेस, पोलीस यांचे कोरोना पार्श्वभूमीवर खूप मोठे योगदान असून ते रात्रंदिवस अविरतपणे कार्य करीत आहेत. दरम्यान, तालुक्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये शेकडो रुग्ण उपचार घेत असून त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी फूल ना फुलाची पाकळी याप्रमाणे खारीचा वाटा म्हणून छोटीशी सेवा करीत आहे. शहरासह तालुक्यातील सर्वच ठिकाणी संगीत रजनीचे कार्यक्रम सादर करण्याचा मनोदय प्रा. सुनील मुंडे यांनी व्यक्त केला.
===Photopath===
070521\sakharam shinde_img-20210507-wa0019_14.jpg